Join us

दोन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळणार का? उद्धव ठाकरे म्हणाले,"आमचं बोलणं सुरु आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 22:10 IST

मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray On Raj Thackeray: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मनोमीलनाची जोरदार चर्चा सुरु होती. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरुन दोन्ही पक्ष जवळपास १८ वर्षांनी एकत्र आले. मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीविरोधात आता मनसे आणि उद्धवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार होता. मात्र सरकारने त्याआधी हिंदी भाषेसंदर्भात शासन निर्णय रद्द केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी मोर्चा न काढण्याचा निर्णय घेतला. मात्र उद्धव ठाकरे यांनी यावेळी ५ जुलै रोजी एकत्र जल्लोष करणार असल्याचे जाहीर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाची एकजुट कायम राहायला हवी अस देखील म्हटलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यापुढे दोन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळणार का याबाबतही भाष्य केलं. 

पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या घोषणानंतर ५ जुलै रोजी होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा देखील रद्द करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत  ५ जुलै रोजी विजयी सभा किंवा मोर्चा होणार असल्याची घोषणा केली. या जल्लोषात मनसेने देखील सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केली. मराठी माणसाची शक्ती पाहून या सरकारने माघार घेतली, त्यामुळे हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पण या मोर्चांच्या निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार होते. एकत्र येऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र यापुढे एकत्र आलो तर संकट येणार नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. आता हे लोण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे.  केवळ संकट आल्यावर जागं व्हायचं आणि संकट गेल्यावर झोपायचं असं करु नका. एकत्र येऊ नये म्हणून त्यांनी हा शासन निर्णय मागे घेतला आहे. आमचं बोलणं सुरु आहे. माझे आणि त्यांचे (राज ठाकरे) प्रत्यक्ष बोलणं झालं नसलं तरी आमचं बोलणं आहे. ५ तारखेला आपला एकत्रित कार्यक्रम व्हायलाच पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी हिंदीच्या मुद्द्यानंतर पुढे दोन्ही पक्ष एकत्र पाहायला मिळणार का असा सवाल केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही, असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर आता दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेराज ठाकरेहिंदी