Join us  

“प्रभू श्रीरामच आता धडा शिकवतील, गुजरातमध्येही भाजपा तडीपार होईल”; उद्धव ठाकरेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 2:37 PM

Uddhav Thackeray News: मोदींचे नाव घेऊन आता काही उपयोग नाही, हे भाजपावाल्यांना कळल्यामुळे रामाचे नाव घेऊन मते मागितली जात आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray News: गुजरातला दोष देत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधूनच गुन्हेगारीच्या अधिक बातम्या येत आहेत. आमचे गद्दारही गुजरातमध्येच पळून गेले होते. सलमान खानच्या घरासमोर गोळीबार केलेलेही गुजरातलाच पळून गेले. ड्रग्जही गुजरातमध्येच मोठ्या प्रमाणावर उतरल्याचे दिसत आहे. यातून गुजरातचीच बदनामी होत आहे. गुजरातमध्येही भाजपाविरोधात निदर्शने केली जात आहेत. गुजरातमधूनही भाजपा तडीपार होईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, प्रभू श्रीरामांमध्ये मोठी शक्ती आहे. तेच आता न्याय करतील. कोणतेही काम न करता रामाचे नाव घेऊन मते मागितली जात आहेत. मोदींचे नाव वापरून काही उपयोग नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच श्रीरामांचे नाव वापरले जात आहे. प्रभू श्रीरामच आता धडा शिकवतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मशालीच्या रुपाने हुकुमशाही भस्म होईल

संपूर्ण देशात हुकुमशाहीविरोधात एक पक्के जनमत तयार झाले आहे. ते फक्त मतदानाची वाट पाहत आहेत. वचननामा जवळपास निश्चित झाला आहे. मशाल चिन्ह नवीन असले तरी सर्वांना आता माहिती झाले आहे. या मशाल चिन्हावरच अंधेरीत पहिला विजय मिळाला होता. मशाल चिन्हावरच विजयाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल चिन्ह पोहोचले आहे. मशालीच्या रुपाने हुकुमशाही राजवट भस्म होईल, असा एल्गार उद्धव ठाकरेंनी केला.

दरम्यान, निवडणूक रोखे घोटाळ्यामध्ये भाजपचे बिंग फुटले आहे. सर्वोच्च न्यायालयामुळे हा सर्व प्रकार समोर आला. जगातील सगळ्यात मोठा घोटाळा हा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे उघड केले नसते तर हजारो कोटी यांना कोणी दिले हे कळले नसते आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम यापुढेही चालले असते. यामुळे आता त्यांची सत्ता येत नाही आणि हे सगळे उघड झाले. हे आधी का झालं नाही याचा विरोधी पक्षांना पश्चाताप होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीशिवसेनालोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४