Maharashtra Monsoon Session 2025: महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने चिखलफेक करताना पाहायला मिळत असतात. मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना दिसतात. अशीच एक घटना विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाली. विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी दरेकरांना शिवनेसेत यावं लागेलं असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्याचे पाहायला मिळालं. यावेळी प्रवीण दरेकर यांनी बोलताना मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचे म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना थेट त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर देऊन टाकली. यानंतर प्रवीण दरेकरांनी दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू फुटलं.
स्वयं पुनर्विकास प्रकल्पाच्या अभ्यास गटासंदर्भात प्रवीण दरेकर हे उद्धव ठाकरे यांना माहिती देत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तू प्रामाणिकपणे करत असशील तर मी कधीही तुझ्याशी बोलायला तयार आहे असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी १०० टक्के मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी हो पण त्या बोगस लोकांना सांग, तू प्रामाणिकपणाने मराठी माणसासाठी काही करत असशील तर मिळून करु पण तुला परत शिवसेनेत यावं लागेल, असं म्हटलं. यावर प्रवीण दरेकरांनी आपण सगळे एकत्र येऊया असं म्हटलं.