Join us  

राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागलंय, उद्धव ठाकरेंचं सामनातून भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 7:40 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. 

मुंबई -   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सामना संपादकीयमधून निशाणा साधला आहे. शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे,  अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरुनच उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. अमित शहा यांच्याशी बरे संबंध असल्यामुळेच चंद्रकांत पाटील आज महसूलमंत्री पदावर आहेत. शिवाय, ‘राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने सरकारवर तोफ डागली.  

 महागाईविरोधात आंदोलन केल्याने शिवसेनेचे हसे झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे व सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे, अशी टीकाही उद्धव यांनी केली आहे. ‘‘अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत’’ असे सांगून सत्तेत आल्यावरही ते ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.  

काय आहे आजचे सामना संपादकीय ?शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील हे तसे बरे गृहस्थ आहेत व त्यांचे अमित शहा यांच्याशी बरे संबंध असल्यामुळेच ते आज महसूलमंत्री पदावर आहेत. तसेच भावी मुख्यमंत्री म्हणूनदेखील ते सदैव शर्यतीत आहेत. आम्ही त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देत आहोत, पण मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगणाऱया एकनाथ खडसे यांची सध्या काय अवस्था झाली आहे याचा अभ्यासही चंद्रकांतदादांनी करायला हवा अशी सूचना एक हितचिंतक म्हणून आम्ही करीत आहोत. महागाईविरोधात आंदोलन केल्याने शिवसेनेचे हसे झाले असे जे म्हणतात त्यांची नाळ जनतेपासून तुटली आहे व सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे. कासकर हा ‘नशे’च्या फेऱयात सापडल्याने त्याला मागचे पुढचे काहीच आठवत नाही व तो असंबद्ध असे काहीतरी बडबडत असल्याचे पोलीस तपासात दिसत आहे. सत्तेच्या जहाल ‘खोपडी’ दारूने

राज्यकर्त्यांच्या डोक्याची हातभट्टीझाल्यानेच त्यांना ‘महागाई’विरोधात आंदोलन करणारे मूर्ख, हास्यास्पद वाटत असावेत. ‘‘अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत’’ असे सांगून सत्तेत आल्यावरही ते ‘अच्छे दिन’ काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत. आम्ही काल अंगणवाडी सेविकांच्या मोर्चात स्वतःहून सामील झालो. कुपोषित बालकांच्या सेवा करणाऱया या माता-भगिनींचे प्रश्न तुम्ही राज्यकर्ते म्हणून खुंटीलाच टांगून ठेवणार असाल तर आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तुम्ही सध्या हवेत तरंगत आहात व आमचे पाय आजही जमिनीवर आहेत हा फरक जरा समजून घ्या. महागाई कमी करा, पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणा. मग आम्ही कशाला आंदोलन करतोय? आमच्या डोक्याचे ‘गांडो थयो’ झालेले नाही. पुन्हा

शेतकरी कर्जमाफीचीही

तशी अजून बोंबच आहे. ऑनलाइन अर्ज भरणे वगैरे ठीक असले तरी कर्जमाफीसाठी सरकारी अटींची पूर्तता करता करता कर्जबाजारी शेतकऱयांचे नाकीनऊ आले आहे. किंबहुना कर्जमाफी नको, या ‘अटी व शर्ती आवरा’ अशी सध्या बळीराजाची अवस्था झाली आहे. कर्जमाफी म्हणजे अद्यापि जणू ‘नाटक’च ठरले आहे आणि ते संपलेले नाही. या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घेणार आहात की नाही? आजच्याच वृत्तपत्रातील एका बातमीने आमचे मन अस्वस्थ झाले आहे. सततची नापिकी, सरकारची कर्जमाफीची दिरंगाई व वयात आलेल्या तीन मुलींचे होणार तरी कसे, या विवंचनेतून महिला शेतकरी भारती दादाजी पाथरे (वय ३७, मु.पो. नाशिक, टेंभे-बागलाण) यांनी शेततळय़ात उडी घेऊन आत्महत्या केली. शिवसेनेचे आंदोलन अशा भारती पाथरेंसारख्या असंख्यांचे प्राण वाचविण्यासाठी आहे. वास्तविक ही जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. मात्र ती पार पाडण्यास राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले आहे. जनतेचे आशीर्वाद आम्हांस आहेत, पण सरकारला ते पटत नसेल तर त्यांच्या डोक्याचा ‘गांडो थयो छे!’ बरोबर ना, चंद्रकांतदादा!

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा