मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत पाठिंब्यावरून उद्धवसेना, शिंदेसेनेत वाक् ‘बाण’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:49 IST2026-01-24T12:48:26+5:302026-01-24T12:49:01+5:30
"सत्तेसाठी पक्षाच्या सन्मानाशी आम्ही तडजोड करणार नाही"

मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत पाठिंब्यावरून उद्धवसेना, शिंदेसेनेत वाक् ‘बाण’
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच सुरू असताना शिंदेसेनेने मुंबईच्या महापौरपदासाठी उद्धवसेनेला पाठिंबा द्यावा, असे वक्तव्य उद्धवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केले आहे. जाधव यांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परंतु, शिंदेसेनेचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे.
एकनाथ शिंदेंनी १०० टक्के उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, तो घेणे न घेणे वेगळी गोष्ट आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते. परंतु, उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जाधव यांचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, सत्तेसाठी आम्ही एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा घ्यावा एवढे वाईट दिवस आमच्यावर आलेले नाहीत. सत्तेसाठी पक्षाच्या सन्मानाशी आम्ही तडजोड करणार नाही.
तर, शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, राजकारणात काहीही होऊ शकते, असे आहे. आता दोन्ही भाऊ (राज व उद्धव ठाकरे) एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा एक विचार आहे. कोण कधी कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर उद्धवसेनेनेच शिंदेसेनेला महापौरपदासाठी पाठिंबा द्यावा, असा टोला शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी लगावला.
प्रस्तावाची गरज नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भास्कर जाधवांचा प्रस्ताव फेटाळला. अशा प्रस्तावाची आम्हाला गरज नाही. काही किरकोळ महापालिका वगळता सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले होते जाधव?
बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल, तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या दिवशी तुम्ही मानसन्मान, गर्व, अधिकार, अहंकार बाजूला सारला पाहिजे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे. बाळासाहेबांना मानत असतील तर त्यांना ते दातृत्व दाखवावे लागेल, असेही भास्कर जाधव म्हणाले होते.