Join us  

कोविडचं नाटक बंद करुन खऱ्या प्रश्नांकडे लक्ष द्या, ई-पास मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 4:08 PM

उद्धव सरकार मोदींच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील जनेतला ई-पास बंधनकारक असल्याने आंबेडकर यांनी सरकारच्या कारभाराला लक्ष्य केले.

ठळक मुद्दे कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात सध्या उधभवलेल्या पूर परिस्थितीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा मोठं संकट राज्यावर येईल.

मुंबई - आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. केंद्राच्या आदेशानंतरही राज्य सरकारने ई-पासची सक्ती कायम ठेवल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर टीका करताना, सरकारच्या धोरणात विसंगती असल्याचं म्हटलंय. आता, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एड. प्रकाश आंबेडकर यांनीही महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे.  

ई-पासची सक्ती मागे घेण्यास केंद्र सरकारने सांगितले असले तरी राज्यातील स्थितीचा विचार करून व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. प्रवासी वाहनांसाठी ई-पासची गरज असली तरी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अशा पासची वा स्वतंत्र परवानगीची गरज नसल्याचे परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मंगळवारी काढले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आंतरजिल्हा प्रवासावरील ई-पाससारखे निर्बंध हटवावेत, अशी मागणी केली. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उद्धव सरकार मोदींच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातील जनेतला ई-पास बंधनकारक असल्याने आंबेडकर यांनी सरकारच्या कारभाराला लक्ष्य केले. ''पती-पत्नी घरी एकत्र राहू शकतात पण स्कुटरवर एकत्र बसू शकत नाहीत. अनोळखी लोकांसोबत प्रवास करायला मुभा दिलीय तर मग एका परिवाराला एकत्र जायला बंदी का? उद्धव सरकार पण मोदींच्या पावलावर पाऊल ठेवायला लागलं आहे. लोकांच्या वैयक्तिक गोष्टींवर निर्बंध आणणं बंद करा. कोविडचं नाटक बंद करून खऱ्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यात सध्या उधभवलेल्या पूर परिस्थितीकडे गंभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा मोठं संकट राज्यावर येईल.'', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. 

फडणवीस यांनीही केली टीका. 

राज्य सरकारच्या धोरणांमध्ये गोंधळ आणि विसंगती दिसून येत आहे. केंद्र सरकारचे निर्णय इतर राज्यात लागू करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्रात ते लागू झालेले दिसत नाही, तो ट्रान्सपोर्टचा मुद्दा असेल किंवा इतर वेगळे निर्णय असतील. ई-पासच्या मुद्द्याचं औचित्यच आता संपलेलं आहे. कारण, लोकं बसने प्रवास करू शकतात, तुम्ही पाहिलंच असेल अनेक मिम्स या मुद्द्यावरुन तयार झाले, व्यंग तयार केले आहेत. त्यामुळे, आता देशाचा विषय संपलाय, तसा महाराष्ट्रातही विषय संपला पाहिजे, असे म्हणत ई-पासचे बंधन संपुष्टात आणण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

‘संकट टळलेले नाही’ई-पास आताच रद्द केला तर सणांच्या काळात आंतरजिल्हा वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढेल. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आताच ई-पासची सक्ती मागे घेणे योग्य ठरणार नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केल्याची माहिती आहे.  

टॅग्स :प्रकाश आंबेडकरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्या