दोन वर्षांपासून ‘इमेज बिल्डिंग’ अन् आता स्वप्नांवर पाणी; संधी हुकलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:11 IST2025-10-10T10:11:22+5:302025-10-10T10:11:32+5:30
२०२२ पासून सभागृह अस्तित्वात नाही. त्यानंतर पालिकेची निवडणूक जाहीर झाली नव्हती. दरम्यानच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना निधी मिळत होता. मात्र विरोधी पक्षांच्या माजी नगरसेवकांना निधीसाठी वणवण करावी लागत होती.

दोन वर्षांपासून ‘इमेज बिल्डिंग’ अन् आता स्वप्नांवर पाणी; संधी हुकलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण स्पष्ट झाल्यामुळे संधी हुकलेल्या माजी नगरसेवकांबरोबरच इच्छुक उमेदवारांचाही भ्रमनिरास झाला आहे. उमेदवारी मिळावी, यासाठी गेली दोन वर्षे इच्छुक मंडळी पदरमोड करून विभागात स्वतःची ‘इमेज बिल्डिंग’ करत होते. त्यांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे.
ज्यांना आरक्षणाचा लाभ होणार आहे, त्यांनी उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०२२ पासून सभागृह अस्तित्वात नाही. त्यानंतर पालिकेची निवडणूक जाहीर झाली नव्हती. दरम्यानच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांना निधी मिळत होता. मात्र विरोधी पक्षांच्या माजी नगरसेवकांना निधीसाठी वणवण करावी लागत होती. निवडणूक कधी जाहीर होते, याकडे त्यांचे डोळे लागले होते.
वरिष्ठांकडे फिल्डिंग
माजी नगरसेवकांनी विविध कामांद्वारे, जाहिरातबाजी करत प्रभागावर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आरक्षणामुळे प्रभागातील गणिते बदलली आहेत. ज्या माजी नगरसेवकांची संधी हुकली, त्या प्रभागात आता नवे इच्छुक पुढे सरसावले आहेत. उमेदवारीसाठी काहींनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.
उमेदवारांचा शोध
संधी हुकलेल्या माजी नगरसेवकांची अन्य प्रभागातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या प्रभागातील त्याच पक्षाचे इच्छुक उमेदवार सावध झाले आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण असलेल्या प्रभागात त्या प्रवर्गातील तगड्या उमेदवारांचा शोध घेण्याचे काम सगळ्याच पक्षांनी सुरू केले आहे.