केईएम रुग्णालयामध्ये पेशंट नोंदणीसाठीच दोन ते तीन तासांचे वेटिंग, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी डीनला विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:13 IST2025-11-11T12:13:16+5:302025-11-11T12:13:31+5:30
KEM Hospital News: मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या गैरसोयींची माहिती घेण्यासाठी सोमवारी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रुग्णालयाला भेट दिली.

केईएम रुग्णालयामध्ये पेशंट नोंदणीसाठीच दोन ते तीन तासांचे वेटिंग, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी डीनला विचारला जाब
मुंबई - मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या गैरसोयींची माहिती घेण्यासाठी सोमवारी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रुग्णालयाला भेट दिली. केवळ नोंदणीसाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना दोन ते तीन तास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अधिष्ठाता
डॉ. संगीता रावत यांना जाब विचारला.
पुढील आठवड्यापर्यंत रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी रुग्णांनी रुग्णालयातील त्रासाचा पाढाच लोढा यांच्यापुढे वाचला. रुग्णांची नोंदणी करणारा विभाग अतिशय रुंद आहे. त्यात साधे पंखेही नाहीत. एकाच जागेवर मोठ्या संख्येने लोक तिष्ठत असतात, याकडे लक्ष वेधण्यात आले.
अनेकदा लिफ्ट बंद असते. रुग्णांना संबंधित विभागात नेताना नातेवाइकांची दमछाक होते.
‘ऑनलाइन प्रणालीच्या वापरावर अधिक भर द्या’
रुग्णालयात नोंदणीसाठी क्यूआर कोड आणि इतर संगणकीकृत यंत्रणा सुरू करण्यासाठी पालिकेने ५५६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असताना अजूनही व्यवस्था कार्यान्वित झाली नसल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
ऑनलाइन प्रणाली वापरा किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करा, पण रुग्णाच्या नोंदीसाठी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ खर्च होता कामा नये, असे निर्देश त्यांनी अधिष्ठाता डॉ. रावत यांना दिले.
वैद्यकीय चाचण्यांसाठी सहा महिन्यांपर्यंत प्रतीक्षा
एमआरआय, सीटीस्कॅन, टू डी इको, सोनोग्राफी या आवश्यक चाचण्यांसाठी रुग्णालयात तीन ते सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. ‘एमआरआय’साठी सध्या मार्च २०२६ पर्यंत, तर सीटीस्कॅनसाठी जानेवारी २०२६ पर्यंत वेटिंग सुरू असल्याचे मंत्री लोढा यांना सांगण्यात आले.
सोनोग्राफीसाठी हीच अवस्था असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही निदर्शनास आणून देणार असल्याचे लोढा म्हणाले.