Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:58 IST

सुमारे १४ मिनिटांच्या या नेत्रदीपक सोहळ्याची सुरुवात सायंकाळी ७.५० वाजता झाली. २ हजार ड्रोनद्वारे बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाचे आकाशात सजीव चित्र उभे केले.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर रविवारी सायंकाळी रंगलेल्या भव्य 'ड्रोन शो'ने मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल २ हजार ड्रोनद्वारे बाबासाहेबांच्या जीवनप्रवासाचे आकाशात सजीव चित्र उभे केले.

सुमारे १४ मिनिटांच्या या नेत्रदीपक सोहळ्याची सुरुवात सायंकाळी ७.५० वाजता झाली. आकाशात झेपावलेल्या ड्रोननी बाबासाहेबांचे शालेय जीवन, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, अस्पृश्यतेविरोधातील संघर्ष, भारतीय राज्यघटनेची निर्मिती तसेच देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य विविध प्रकाशचित्रे आणि आकृत्यांमधून उलगडले. ही दृश्ये पाहताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यापुढे १३ एप्रिलला सोहळा

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी, "बाबासाहेबांचे विचार नसते तर समाजाची प्रगती शक्य झाली नसती. १४ एप्रिल हा दिवस प्रत्येकाच्या मनात कायम आहे," असे सांगितले. तसेच पुढल्या वर्षीपासून १३ एप्रिलला हा सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाईल, असे आश्वासन दिले. 

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले, जो कोणी बाबासाहेबांच्या विचारावर चालेल त्याच्या हातामध्ये यशच मिळेल. यशाची गुरुकुल्ली बाबासाहेबांनी बांधलेल्या विचारांमध्ये असून ती भारताच्या संविधानाने दिली.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. केंद्रीयमंत्री रामदास आठवले, महापौर रितू तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, तमिळ सेल्वन, माजी आ. सदा सरवणकर व इतर उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : 2,000 Drones Illuminate Dr. Ambedkar's Life, Captivating Mumbai

Web Summary : A drone show at Shivaji Park, Mumbai, celebrated Dr. Ambedkar's 135th birth anniversary. Two thousand drones depicted his life journey, including his education and fight against untouchability. Social Justice Minister announced plans for larger celebrations next year. Cultural Affairs Minister highlighted Ambedkar's guiding principles for success.
टॅग्स :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुंबई