दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी चार गुन्ह्यांची उकल करून चार गुन्ह्यांची उकल करून चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी सोमवारी दिली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ग्लोबल सिटीतील अग्रवाल पॅरामाऊंट बिल्डिंग नंबर १ मध्ये राहणाऱ्या मंगेश पाटील (३८) यांची ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली होती. १२ ते १३ जून दरम्यान बिल्डिंगच्या मागील बाजूला पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली होती. बोळींज पोलिसांनी सोमवारी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. बोळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी गुन्हे प्रकटीकारण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरी झालेल्या दुचाकींचा व आरोपींचा छडा लावण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार बोळींजच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी हद्दीत उघड दुचाकी चोरीचे गुन्ह्यांच्या घटनास्थळी भेट दिली. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे सुक्ष्म परिक्षण करुन त्यामध्ये दिसत असलेल्या संशयीत दुचाकी चोरणाऱ्याचा मागोवा घेत होते. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी अनुराग सुंदरम आणि मान्तेश कोळी या दोघांना ताब्यात घेतले. आरोपीकडे केलेल्या कौशल्यपुर्ण तपासात चोरी केलेल्या १ लाख रुपये किंमतीच्या ३ दुचाकी असा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. यानंतर गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडूनही चोरी केलेली एक दुचाकी हस्तगत केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त विजय लगारे यांचे मार्गदर्शनाखाली बोळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश सावंत, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी आणि विष्णु वाघमोडे, सफौ. जनार्दन मते, किशोर धनु, पोलीस अंमलदार रोशन पुरकर, प्रफुल सरगर, संदीप शेळके, सुखराम गडाख आणि मसुब सागर देशमुख यांनी केली आहे.