Two researchers from IIT Mumbai are the recipients of Bhatnagar Award | आयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी

आयआयटी मुंबईतील दोन संशोधक भटनागर पुरस्काराचे मानकरी

मुंबई : विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची शनिवारी घोषणा झाली. देशातील १० संशोधक यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरले. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे, तीन मुंबईकर तर एक पुणेकर शास्त्रज्ञ संशोधकांनी हा मान पटकावला.

देशातील तरुण शास्त्रज्ञांना त्यांच्या लक्षवेधी संशोधन कार्याबद्दल दरवर्षी ‘भटनागर’ पुरस्काराने गौरविण्यात येते. मुंबईतील भाभा आॅटोमिक रिसर्च सेंटर येथील शास्त्रज्ञ डॉ. किंशुक दासगुप्ता यांना अर्थ, अ‍ॅटमॉसफिअर, ओसीअन अँड प्लॅनेटरी सायन्स विभागात, तर मॅथमॅटिकल सायन्स विभागात आयआयटी मुंबईचे डॉ. यू. के. आनंद वर्धनन यांना पुरस्कार जाहीर झाला. तर, आॅरगॅनिक जिओकेमिस्ट्री आणि मॉल्युक्युलर पालेंबायोलॉजी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या डॉ. सूर्येंदू दत्ता यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला. अर्थ, अ‍ॅटमॉसफिअर, ओसीअन अँड प्लॅनेटरी सायन्स विभागात त्यांना हा पुरस्कार मिळाला. डॉ. दत्ता यांनी प्लांट डिराइव्हड टर्पेनॉइड्सच्या उत्क्रांतीवर काम केले आहे.

पुण्याच्या मराठमोळ्या अमोल कुलकर्णींनाही मान
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागात कार्यरत डॉ.अमोल कुलकर्णी यांना इंजिनीअरिंग सायन्समधील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला. देशात फार कमी शास्रज्ञ मल्टिफेसिक रिअ‍ॅक्टर अँड मायक्रो रिअ‍ॅक्टरवर संशोधनाचे काम करतात आणि त्यापैकी एक डॉ.कुलकर्णी आहेत.
पुरस्काराचा मानकरी ठरल्याचा आनंद - यू. के. आनंदवर्धनन
भटनागर पुरस्काराचा मानकरी ठरलो, याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया डॉ.यू.के. आनंदवर्धनन यांनी दिली. हैदराबाद विद्यापीठातून पीएच.डी पूर्ण केल्यानंतर मी टीआयएफआर या संस्थेत काम केल्याची माहिती त्यांनी दिली. माझ्या शिक्षकांना, मार्गदर्शकांना धन्यवाद देण्याची हीच योग्य वेळ आहे. २००५ नंतर आयआयटी मुंबईत आल्यानंतर येथील विद्यार्थी, सहशास्त्रज्ञामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थ, अ‍ॅटमॉसफिअर, ओसीअन अँड प्लॅनेटरी सायन्स विभागात डॉ. सूर्येंदू दत्ता यांना हा पुरस्कार जाहीर झाला. प्राणी, वनस्पती संवाद, वनस्पती यात महत्त्वाचा भाग असणाºया चयापचय क्रियेच्या संशोधनावर सध्या ते काम करत आहेत.

अभिमानास्पद बाब
आयआयटी मुंबईचे प्राध्यापक उत्तम दर्जाचे संशोधक-शास्त्रज्ञ आहेत. तज्ज्ञ प्राध्यापकांकडून आयआयटीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आमच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनसाठी देशातील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला, ही आमच्यासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. - सुभाषिश चौधरी, संचालक आयआयटी मुंबई

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two researchers from IIT Mumbai are the recipients of Bhatnagar Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.