Join us  

सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला करणा-या आरोपींना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून केलं पोलिसांच्या हवाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 10:06 AM

मालाड पश्चिम मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या दोघा आरोपींना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून या दोघा आरोपींना पडकलं.

ठळक मुद्देमनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या दोघा आरोपींना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलंमनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून या दोघा आरोपींना पकडलं मालाड पोलिसांनी आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं आहे28 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी अनधिकृत फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता

मुंबई - मालाड पश्चिम मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या दोघा आरोपींना मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदरमधून या दोघा आरोपींना पकडलं. मालाड पोलिसांनी आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं आहे. 28 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी अनधिकृत फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला होता. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन सुशांत माळवदे यांची भेट घेतली होती. सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

संजय निरुपम यांच्याकडून समर्थनहल्ला होण्याच्या काही वेळापुर्वी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची सभा मालाडमध्ये पार पडली होती. त्यांनी फेरीवाल्यांशी संवाद साधला होता. संजय निरुपम यांनी चेतावल्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केल्याचा आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला होता. याचे गंभीर परिणाम मुंबईभर पहायला मिळतील असा इशारा संदीप देशपांडे यांनी संजय निरुपम यांना दिला होता. दुसरीकडे संजय निरुपम यांनी मनसेचे कार्यकर्ते हफ्ता मागत होते, त्यांच्यामुळेच फेरीवाल्यांनी हल्ला केला असं सांगत समर्थन केलं. विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. 

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस काढणार मोर्चाकाँग्रेस येत्या बुधवारी म्हणजेच 1 नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येणार आहे. दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. मात्र काँग्रेसच्या या मोर्चामुळे वाद अजून चिघळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. 

राज ठाकरेंनी दिला होता 15 दिवसांचा अल्टिमेटमएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढून रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.  ही डेडलाइन संपल्यानंतर ठाणे, कल्याणसह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईलने आंदोलन सुरु केलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासही सुरुवात केली होती. राज ठाकरे यांनी मात्र फेसबुकच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं समर्थन केलं होतं. जिथे जिथे अन्याय, गैरप्रकार दिसेल तिथे महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं होतं. 

टॅग्स :मनसेराज ठाकरेपोलिस