कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदारासह दोघांना अटक; निष्काळजीपणाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 06:23 IST2025-03-11T06:21:21+5:302025-03-11T06:23:04+5:30
जे जे मार्ग पोलिसांची कारवाई

कामगार मृत्यूप्रकरणी कंत्राटदारासह दोघांना अटक; निष्काळजीपणाचा ठपका
मुंबई : नागपाडा येथील बिस्मिल्ला स्पेस इमारतीत झालेल्या कामगारांच्या मृत्यूप्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी कामगार, कंत्राटदार आणि साइट सुपरवायझर यांना अटक केली आहे. दोघांनी सुरक्षेची कुठलीही खबरदारी न घेता कामगारांना टाकीत उतरवत कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोपावरून कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, विकासक निर्बान इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने अब्दुल दालीम शेख (वय ३६), अनिमेश बिश्वास (३३) यांना इमारतीसाठी बांधकाम कामगार पुरविण्याची जबाबदारी दिली. त्यांनी इमारतीचे बेसमेंटमध्ये पाण्याच्या टाकीच्या संदर्भात होत असलेल्या कामाबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचेही विकासकाने पोलिसांना सांगितल्याचे समोर येत आहे. अनिमेश हा कंत्राटदार, तर अब्दुल हा साइट सुपरवायझर म्हणून कार्यरत होते.
प्राथमिक चौकशीत या दोघांनी कुठलीही दक्षता न घेता भरपूर दिवसांपासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकीत कामगारांना उतरविले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच बुटन अर्शद शेख याच्या जिवालाही धोका निर्माण केल्याचे स्पष्ट झाले. पोलिस हवालदार धनराज महाले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कलम १०६ (१), १२५, ३(५) भारतीय न्यास संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे
नेमका मृत्यू कशामुळे झाला ? याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. सहा रासायनिक विश्लेषण तज्ज्ञ शरद चंद्रभाल पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जे जे रुग्णालयाकडून मृत कामगारांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
कंत्राटदाराविरुद्ध यापूर्वीही गुन्हा
आरोपी अनिमेश विरुद्ध यापूर्वीदेखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरुद्ध आणखीन कुठे गुन्हे नोंद आहेत का ? याबाबत पोलिस तपास करीत आहे. विकासकानेही कंत्राटदाराची पार्श्वभूमी तपासली होती का ? असाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
शॉक लागल्याचा कॉल...
नागपाडा येथील बिस्मिला स्पेस इमारतीत चार कामगारांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा कॉल रविवारी दुपारी नियंत्रण कक्षात आला. पोलिसांच्या चौकशीत, पाण्याच्या टाकीचे सिमेंटचे मॅनहोल उघडून टाकीच्या आत छताला लावलेल्या स्लॅबच्या फळ्या काढण्याचे काम चालू होते. या कामासाठी चार कामगार हे मॅनहोलमधून टाकीत उतरले होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला.