अडीच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी दोघांना अहमदाबादमधून अटक
By मनोज गडनीस | Updated: January 23, 2024 17:20 IST2024-01-23T17:16:18+5:302024-01-23T17:20:36+5:30
मुंबई विमानतळावर पकडले होते सोने, मुंबई डीआरआयची कारवाई.

अडीच कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी दोघांना अहमदाबादमधून अटक
मनोज गडनीस,मुंबई : तब्बल अडीच कोटी सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोन जणांना मुंबई विमानतळावरून अटक केल्यानंतर आता याच प्रकरणी अन्य दोन आरोपींना अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. १७ जानेवारी रोजी मुंबई विमानतळावर केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा पर्दाफाश केला होता. यावेळी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे या अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सोने सौदी अरेबिया येथील जेद्दा शहरातून मुंबईत आले होते व येथून ते अहमदाबाद येथे नेण्यात येणार होते. तेथील दोन लोक या सोन्याचे वितरण अन्यत्र करणार होते. या सोन्याची वाट पाहात या दोन आरोपींनी अहमदाबाद येथील एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. त्यांना त्या हॉटेलमधूनच अटक करण्यात आली आहे. अटकेदरम्यान त्यांच्याकडे ५ लाख २१ हजारांची रोख रक्कम आढळून आली. ती रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे.