Join us

अग्निकल्लोळाचे दोन बळी, मशीद बंदर, वडाळ्यात इमारतींना आग, तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 05:13 IST

आगीच्या या घटनांत मशीद बंदरमधील इमारतीतील दोन महिलांचा गुदमरून मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

मुंबई : मशीद बंदर आणि वडाळा परिसर रविवारी आगीच्या घटनांनी हादरला. मशीद बंदरमधील ११ मजली इमारतीला सकाळी सहा वाजता तर वडाळ्यातील एसआरए इमारतीला रात्री उशिरा आग लागली. आगीच्या या घटनांत मशीद बंदरमधील इमारतीतील दोन महिलांचा गुदमरून मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

मशीद बंदर परिसरातील राम मंदिराजवळील पान अली मॅन्शन या ११ मजली इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सला सकाळी सहा वाजता आग लागली. आगीने क्षणार्धात उग्र रूप धारण केले. पहिल्या मजल्यापर्यंत आग पोहोचली. आगीच्या धुरात गुदमरून साजिया शेख (३०) आणि सबिला शेख (४२) या दोन महिलांचा मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पाऊण तासांच्या प्रयत्नांनंतर इमारतीमधील आग आटोक्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना

दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या शाहीन शेख या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे, तर नकीस सुरती आणि सौदा आलम शेख यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आल्याची माहिती जे. जे. रुग्णालय प्रशासनाने दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

१३व्या मजल्यावर आग

दुसऱ्या घटनेत वडाळा येथील बरकत अली नाक्याजवळील श्रीजी टॉवरलगतच्या एसआरए इमारतीतील १३व्या मजल्यावरील सदनिकेला रात्री दहाच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दल आणि वडाळा टीटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत सदनिकेचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

टॅग्स :आगमुंबई