मुंबई - वक्फ सुधारणा विधेयकावरून देशात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सरकारने हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर केले आहे. त्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवून त्यांच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. परंतु वक्फ सुधारणा विधेयकावरून मुस्लीम समाजातच २ मतभेद असल्याचं दिसून येत आहे. काही मुस्लीम नेते वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने जनजागृती करत आहेत तर काही या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. मुंबईत वांद्रे येथे मुस्लीम समाजातील २ गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं.
वांद्रे येथे एका मुस्लीम गटाकडून या विधेयकाच्या समर्थनार्थ जनजागृती केली जात होती. त्यातील नेते म्हणाले की, संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. हे खूप चांगले विधेयक असून काही जण राजकीय पोळी भाजण्यासाठी, त्यांचं वर्चस्व टिकवण्यासाठी आमच्या समाजाची दिशाभूल करत आहे. त्यांची माथी भडकवत आहेत. आमचा समाज आणि बहुसंख्याक यांच्यात दंगल घडवण्याचा प्लॅन केला जात आहे. मुस्लिमांमध्ये गैरसमज नको, देशातील एकता, अखंडता कायम राहण्यासाठी आम्ही आज कॅम्पेन चालवत आहोत. आमचे कार्यकर्ते प्रत्येक मशिदीबाहेर लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहोत असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय कुणाच्यातरी सांगण्यावरून मत बनवण्याऐवजी हे विधेयक वाचावे. विधेयकाचा आढावा घ्या, जर वाचल्यानंतरही या विधेयकात काही कमतरता आहे, त्रुटी आहेत तर त्याचा नक्कीच विरोध करावा. विरोध करणे संविधानिक अधिकार आहे. परंतु आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून याचे पालन करायला हवे. आपल्यामुळे कायदा सुव्यवस्थेत बिघाड नको. देशाच्या विकासासाठी आपल्याला एकत्र राहायला हवे. जे आपल्या भावनांशी खेळत आहेत त्यांना संधी द्यायला नको. इतकी वर्ष आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतायेत त्यांना तसे करू देऊ नका असं या मुस्लीम नेत्यांनी म्हटलं.
दरम्यान, मुस्लीम समाजातील काही जणांच्या जनजागृती मोहीमेतच विधेयकाचा विरोध करणारा गट समोर आला. हे दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू होती. त्यात पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने पुढचा अनर्थ टळला.