Join us  

नागपाड्यातील आंदोलन मागे घेण्यावरून आंदोलकांत पडले दोन गट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 3:45 AM

समन्वयकांना अंधारात ठेवून काही महिलांची माघार

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात २६ जानेवारीपासून नागपाडा येथे सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनामध्ये आंदोलन मागे घेण्यावरून दोन गट पडले आहेत. आंदोलनस्थळी असलेल्या तरुणांच्या एका गटाने याबाबतच्या समन्वय समितीला अंधारात ठेवून आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे काही महिला घरी परत गेल्या. मात्र, अद्यापही काही महिला आंदोलनस्थळी थांबल्या आहेत. महिला आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाटत असल्याने, परिस्थिती संशयास्पद व धोकादायक झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा आंदोलनातील तरुणांनी केला.

या आंदोलनाच्या समन्वय समितीचे सदस्य आमदार रईस शेख, आमदार अमीन पटेल, माजी आमदार वारीस पठाण व निमंत्रक मोहम्मद नसीम सिद्दीकी हे मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटण्यासाठी गेलेले असताना, काही स्थानिक तरुणांनी समितीला विश्वासात न घेता, हा निर्णय घेतल्याची माहिती नसीम सिद्दीकी यांनी दिली. पुढील शुक्रवारी हे आंदोलन नागपाडा येथून मागे घेऊन, त्यानंतर झुला मैदानात हे आंदोलन स्थलांतरित करण्याचा समितीचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली.

ज्या तरुणांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला, त्यांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे हा निर्णय घेतला, याची माहिती घेतली जात आहे. कुणाच्या दबावाखाली, कुणाच्या हातमिळवणीमुळे हा निर्णय घेण्यात आला का, ते तपासले जात असल्याचे सिद्दीकी यांनी स्पष्ट केले.

‘आंदोलन मागे घेण्याचा निर्णय तरुणांचा’

आंदोलन मागे घेण्याची माहिती देताना आंदोलक फुरकान सय्यद म्हणाले, सध्या या आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढू लागल्याने व अप्रिय घटना घडू नये, यासाठी शहजाद अब्राहणी व इतर सर्व प्रमुख तरुणांनी एकत्रितपणे बसून चर्चा केली.

महिला आंदोलकांसोबतही चर्चा करण्यात आली व त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्याप काही महिला आंदोलन करत असल्या, तरी आम्ही आता तिथे नसून, या आंदोलनातून बाहेर पडल्याचे त्यांनी जाहीर केले. काही विपरित घडल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर, स्थानिक तरुणांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे जास्त काही बोलण्यास आंदोलक फिरोज मिठीबोरवाला यांनी नकार दिला.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयकमुंबईमहाराष्ट्रपोलिस