- मनिषा म्हात्रे, मुंबईMumbai Crime: रविवारी रात्री तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली. जुन्या वादातून दोन कुटुंबात भांडण झालं. वाद इतका विकोपाला गेला की, त्याचं पर्यावसान हाणामारीत झालं. त्यानंतर चक्क चाकू आणि कोयत्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. यात तिघांचा मृत्यू झाला. तर चार लोक जखमी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिसर येथील गणपत पाटील नगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या शेख व गुप्ता कुटुंबियाविरुद्ध २०२२ मध्ये क्रॉस गुन्हे दाखल होते. तेव्हापासून त्यांच्यात वैमनस्य आहे.
हाणामारीत तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
रविवारी (१८ मे) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गणपत पाटील नगर गल्ली नंबर १४ च्या रस्त्यावर राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉल समोर हमीद शेख हा दारू पिऊन आल्यावर त्यांच्यात वाद सुरु झाले.
दोघांनी आपल्या मुलांना बोलावले. गुप्ता त्यांची मुले अमर गुप्ता, अरविंद गुप्ता व अमित गुप्ता यांनी आणि हमीद नसिरुद्दीन शेख, त्याची मुले अरमान हमीद शेख व हसन हमीद शेख यांच्यामध्ये हाताने व धारदार शस्त्राने मारामारी झाली.
या हाणामारीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांची पळापळ सुरू झाली.
हल्ल्यामध्ये कोणाचा झाला मृत्यू?
घटनेची वर्दी लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात राम नवल गुप्ता (वडील) व अरविंद गुप्ता हे मयत झाले असून, अमर गुप्ता व अमित गुप्ता गंभीर जखमी झाले आहे.
तसेच हमीद शेख (वडील) याचाही मृत्यू झाला असून, मुलगा अरमान शेख व हसन शेख जखमी झाले आहेत.
मृतदेह शताब्दी हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहेत. दोघांविरुद्ध क्रॉस हत्येचे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. आरोपी जखमी असल्याने अटक बाकी असल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.