Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरार-डहाणु दरम्यान उद्यापासून दोन जादा मेमू धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 19:08 IST

पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणु दरम्यान १६ जुलैपासून मेमूच्या दोन जादा सेवा चालविण्यात येणार आहेत.  

मुंबई :  पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणु दरम्यान १६ जुलैपासून मेमूच्या दोन जादा सेवा चालविण्यात येणार आहेत.  डहाणू रोड येथून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुटलेली गाडी विरार स्थानकात सकाळी ६ वाजता येणार आहे. विरार स्थानकातून रात्री १०.५५ ला सुटलेली मेमू डहाणू रोड स्थानकात रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल.

पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोली, पालघर, सफाळे,वैतरणा येथून बोरिवली, अंधेरी येथील शताब्दी रुग्णालय, भागवती हॉस्पिटल बोरिवली, ओशिवारा कूपर, नायर, के. एम सायन अशा अनेक रुग्णालयातील ३०० डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, अशा अत्यावश्यक सेवांसाठी दररोज प्रवास करीत असताना,

मात्र त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय होती. त्यामुळे मेमू सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी १५ जून पासून लोकल प्रवास सुरु करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज  लोकलच्या ३५० फेर्‍या चालविण्यात येतात. त्यापैकी १६१ लोकल फेर्‍या या चर्चगेट ते विरार दरम्यान धावतात. ७ लोकल फेर्‍या नालासोपारा ते चर्चगेट, वसई रोड ते चर्चगेट,  विरार ते  चर्चगेट प्रत्येकी दोन लोकल फेर्‍या , विरार, वसई रोड ते बोरिवली दरम्यान प्रत्येकी दोन फेर्‍या, चर्चगेट ते बोरिवली दरम्यान १३४ फेर्‍या, महालक्ष्मी ते बोरिवली ६, चर्चगेट ते डहाणू रोड  ६, बोरिवली ते डहाणू २, विरार ते डहाणू दरम्यान २८फेर्‍या धावतात.

वैद्यकीय विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या संख्येने डहाणु-विरार येथून प्रवास करतात. त्यांच्या वेळेत लोकल सेवा नसल्याने त्यांना कार्यालयात पोहचण्यास विलंब होत होता. यामुळे डहाणु ते विरार लोकल सेवा वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पश्चिम प्रशासनाने आता विरार ते डहाणू दरम्यान मेमूच्या २ फेर्‍या वाढविल्या आहेत.

टॅग्स :मुंबईरेल्वे