Join us

१०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 16:05 IST

महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामाचा प्रत्यक्षपणे आढावा घेणार असल्याचे मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आढावा बैठकीदरम्यान सूचित केले आहे.

 

मुंबई : कंटेनमेंट झोनविषयक कार्यवाही अधिक प्रभावी व्हावी, यासाठी प्रत्येक कंटेनमेंट झोनसाठी समन्वयक म्हणून कोविड योद्धयांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात करावी.  सर्व विभाग स्तरीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या, त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे.  कंटेनमेंट झोन परिसरात आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तूंचा यथायोग्य पुरवठा होत असल्याची खातरजमा वेळोवेळी करून घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महापालिका क्षेत्रातील १०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले. दरम्यान, महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामाचा प्रत्यक्षपणे आढावा घेणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी आढावा बैठकीदरम्यान सूचित केले आहे.मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिका-यांची एक विशेष आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला विशेष कार्य अधिकारी मनीषा म्हैसकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी प्राजक्ता लवंगारे, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू व रमेश पवार, उपायुक्त चंद्रशेखर चोरे उपस्थित होते.करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुरु असलेल्या कार्यवाहीचा आढावा महापालिका आयुक्तांनी सदर बैठकीदरम्यान घेतला. सर्वांनी नियोजनपूर्वक व अधिक प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. यासाठी आपापल्या कार्यक्षेत्राची परिस्थिती व गरज लक्षात घेऊन सूक्ष्मस्तरीय नियोजन करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम आणखी प्रभावीपणे आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे आहे. सध्या हे प्रमाण एका बाधीत रूग्णाच्या मागे ३ असे दिसते.  हे प्रमाण किमान एकाच्या मागे ६ असे असावे.  यात अति धोकादायक संपर्कांचा कसून शोध घेतला जायला हवा. झोपडपट्टयांमधील असे संपर्क लगेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात स्थलांतरीत करावे. सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कार्य व जबाबदा-यांचे अधिक सुनिश्चित व अधिक परिणाम कारक वाटप करावे.सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त हे त्यांच्या विभागाचे आयुक्त  आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागात घडणा-या विविध बाबींवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे व आवश्यक ती कार्यवाही वेळोवेळी करणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने त्यांच्या कार्यक्षेत्रात महापालिकेची जी रुग्णालये येतात, त्या रुग्णालयांमधील कार्यवाहीवर लक्ष ठेवणे व तेथील व्यवस्था अधिकाधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देऊन अपेक्षित कार्यवाही करवून घेणे; ही बाब देखील सहाय्यक आयुक्तांनी करवून घ्यावयाची आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांची बेड क्षमता वाढविण्यासह बेड व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीला गती द्यावी.

-----------------------------

- एखाद्या विभागातील रूग्णालयात जागा नसल्यास, ज्या विभागात व्यवस्था होऊ शकते, अशा अन्य विभाग क्षेत्रातील रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी.- कंटेनमेंट झोन विषयक कार्यवाहीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.- पोलिसांच्या स्तरावर आवश्यक तो समन्वय नियमितपणे साधावा.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई