लाचप्रकरणी डीआरआयचे दोन अधिकारी अटकेत; आरोपी शैलेश व्यासच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 06:49 IST2025-10-16T06:48:43+5:302025-10-16T06:49:00+5:30
वरिष्ठ गुप्तचर अधिकारी दीपक कुमार आणि निरीक्षक चेतन पारिख अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना नंतर अटकही करण्यात आली आहे.

लाचप्रकरणी डीआरआयचे दोन अधिकारी अटकेत; आरोपी शैलेश व्यासच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनंतर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कीटकनाशक आयातप्रकरणी एका व्यापाऱ्याला अटक केल्यानंतर त्याच्या पत्नीकडून पतीला सोडवण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) दोन अधिकाऱ्यांना डीआरआयच्या आयुक्तांनी निलंबित केले. वरिष्ठ गुप्तचर अधिकारी दीपक कुमार आणि निरीक्षक चेतन पारिख अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यांना नंतर अटकही करण्यात आली आहे.
शैलेश व्यास हे बर्ना इंटरनॅशनल नावाच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांनी परदेशातून कीटकनाशक आयात केले होते. त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस किंवा समन्स जारी करण्यात आले नव्हते, तरीही ३० सप्टेंबर रोजी ते दुबईतून कोलकात्ता येथे विमानतळावर उतरले तेव्हा डीआरआयच्या या दोन अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची १० तास चौकशी केली. प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना मुंबईत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांनी अवैधरीत्या कीटकनाशके आयात करीत त्यावरील आयात शुल्क बुडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
व्यास यांनी हे सर्व आरोप फेटाळले. मात्र, त्याच दरम्यान दीपक कुमार आणि चेतन पारिख यांनी सुरेश नंदा नावाच्या एका व्यक्तीमार्फत व्यास यांची पत्नी प्रतिभा हिच्याशी संपर्क करीत तिच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार प्रतिभा यांनी आयुक्तांकडे केली आहे, तसेच या पैशांसाठी सातत्याने कसा पाठपुरावा केला याची तपशीलवार माहितीदेखील त्यांनी दिली होती.
जीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
केंद्रीय वस्तू व सेवा कराशी (सीजीएसटी) निगडित एका कंपनीच्या प्रकरणात तब्बल ५० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सीजीएसटी विभागाच्या नाशिक येथे कार्यरत अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात सीबीआयने येथे गुन्हा नोंदवला आहे. हरिप्रकाश शर्मा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
एका खासगी कंपनीच्या सीजीएसटीशी संबंधित कायदेशीर प्रकरणात कंपनीच्या विरोधात कारवाई न करण्याचे आश्वासन देत त्या बदल्यात शर्मा याने ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम २२ लाख रुपये इतकी निश्चित झाली. या लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी ५ लाख रुपयांची रक्कमेची मागणी शर्मा याने केली होती.