Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाच्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू; साकी नाका दुर्घटनेत लाखाेंचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 07:05 IST

अंधेरी पूर्व येथील साकी नाका मेट्रो स्थानकाच्या बाजूलाच राजश्री इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर असे तळ अधिक दोन मजली दुकान होते.

मुंबई : अंधेरीतील साकी नाका येथील इलेक्ट्रिक हार्डवेअरच्या दुकानाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत दोन तरुणांचा मृत्यू झाला. दुकानातील लाखो रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भयंकर होती की ज्वालांमुळे दुकानाचा स्लॅबही कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही तासांत आग आटोक्यात आणली. आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे राकेश गुप्ता (वय २२) आणि गणेश देवाशिष (२३) अशी आहेत. 

अंधेरी पूर्व येथील साकी नाका मेट्रो स्थानकाच्या बाजूलाच राजश्री इलेक्ट्रॉनिक आणि हार्डवेअर असे तळ अधिक दोन मजली दुकान होते. दुकानाला मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानाच्या वरच्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून गेल्या. आग काही क्षणांतच पसरली. अग्निशमन दलाला  या आगीची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र पहाटे पाचच्या सुमारास वाऱ्यामुळे आग पुन्हा भडकली. जवानांनी दहा अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर पुन्हा नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

टॅग्स :आगमुंबई