मुंबईत भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 24, 2023 23:04 IST2023-06-24T22:51:06+5:302023-06-24T23:04:28+5:30
गोवंडी येथील नवीन बस डेपोजवळ आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली

मुंबईत भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू
मुंबई - गोवंडी परिसरात नाल्यात पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचा नालेसफाईता दावा फोल ठरला आहे. पूर्व उपनगरातील गोवंडीमध्ये भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खाजगी कंत्राटी कामगार साफसफाईचे काम करत असताना ही घटना घडली असल्याची माहिती पालिकेच्या एसडब्ल्यूडी(घन कचरा विभाग) कडून देण्यात आली आहे.
गोवंडी येथील नवीन बस डेपोजवळ आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दोघांचा बुडाल्यामुळे मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी भूमिगत गटाराच्या मॅन होलमध्ये दोन व्यक्ती पडल्याची माहिती दिली. या दोन्ही व्यक्तींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रामकृष्ण (वय २५ वर्षे) आणि सुधीर दास (वय ३० वर्षे) अशी दोन्ही मृत व्यक्तींची नावे आहेत.