स्कायवॉकच्या देखभालीवर दोन कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी, पालिकेसाठी ठरताहेत पांढरा हत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:30 IST2025-01-04T14:29:23+5:302025-01-04T14:30:08+5:30
एमएमआरडीएने मुंबईच्या विविध विभागांत ३६ स्कायवॉक बांधले होते. त्यापैकी अनेक स्कायवॉकचा वापर होत नसल्याने ते निरुपयोगी ठरल्याचे दिसत आहे.

स्कायवॉकच्या देखभालीवर दोन कोटींचा खर्च, अनेक ठिकाणी सुविधा निरुपयोगी, पालिकेसाठी ठरताहेत पांढरा हत्ती
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेल्या ३६ स्कायवॉकच्या देखभालीवर मुंबई महापालिकेकडून वर्षाला दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्यानंतरही या स्कायवॉकची दुरवस्था होऊ लागली आहे. त्यामुळे हे स्कायवॉक पालिकेसाठी एक प्रकारे पांढरा हत्तीच ठरू लागले आहेत.
एमएमआरडीएने मुंबईच्या विविध विभागांत ३६ स्कायवॉक बांधले होते. त्यापैकी अनेक स्कायवॉकचा वापर होत नसल्याने ते निरुपयोगी ठरल्याचे दिसत आहे. विक्रोळी पश्चिमेतील स्कायवॉकवरून दिवसाला रोज किती लोक ये-जा करतात, हा संशोधनाचा विषय आहे. घाटकोपर पश्चिमेकडील स्कायवॉकवर तर लोकांच्या वर्दळीपेक्षा प्रेमीयुगुलांचीच गर्दी अधिक असते.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
एमएमआरडीएने २०१६ साली स्कायवॉक देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केले. या स्कायवॉकच्या देखभालीवर पालिका वर्षाला दोन कोटी रुपये खर्च करते. परंतु, पैसे खर्च करूनही देखभाल व्यवस्थित होत नाही, असेच चित्र दिसते. काही स्कायवॉकवर गरिबांनी संसार थाटले आहेत.
स्कायवॉकच्या रेलिंगवर त्यांच्याकडून कपडे वाळत टाकले जातात. ही मंडळी त्याच ठिकाणी झोपतात. तर, काही ठिकाणचे स्कायवॉक फेरीवाल्यांनी बळकावलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नागरिकांना सकाळी, सायंकाळी गर्दीच्या वेळी स्कायवॉकवरून ये-जा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
काही स्कायवॉक गर्दुल्ल्यांनी ताब्यात घेतले आहेत. दिवसा-रात्रीही त्यांचा मुक्काम तेथे असतो. त्यांच्या भीतीमुळे विशेषत: महिला स्कायवॉकचा वापर करणे टाळतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास कोणी धजावत नाही.
मुंबई महापालिकेकडून स्कायवॉकवर डागडुजी आणि प्रकाश योजनांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. मध्यंतरी एका संस्थेने स्कायवॉकची पाहणी करून कोणत्या भागातील स्कायवॉकवर त्रुटी आहेत, याचा अहवाल आम्हाला दिला होता. त्या अनुषंगाने कार्यवाही केली जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे पुरेशी प्रकाशयोजना ठेवण्यात येईल. ज्या ठिकाणी स्कायवॉकची पडझड झाली आहे, तिथे डागडुजी केली जाईल. फेरीवाले आणि असामाजिक घटकांचा स्कायवॉकवरील वावर थांबवण्याची कार्यवाही विभाग स्तरावर अपेक्षित असून, संबंधित विभाग अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सरकते जिने बंद
- नाना चौकातील स्कायवॉक तर भला मोठा आहे. या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे रस्ता ओलांडणे कठीण असते.
- बघायला गेले तर हा स्कायवॉक उपयोगाचा आहे. परंतु, तेथील काही सरकते जिने बंद असतात. काही भागांतील स्कायवॉकवर तर सुरक्षारक्षकांचा पत्ताच नसतो. त्यामुळे तेथील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.