कोस्टल रोडवर पर्यटकांसाठी दोन बायोटॉयलेटची सुविधा, लवकरच आणखी दोन शौचालये उपलब्ध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:07 IST2025-10-14T17:06:48+5:302025-10-14T17:07:44+5:30
सागरी किनाऱ्याची नागरिकांना सैर करता यावी, यासाठी महापालिकेने कोस्टल रोडलगट सुमारे सव्वा पाच किलोमीटर लांबीचा विहार पथ तयार केला आहे.

कोस्टल रोडवर पर्यटकांसाठी दोन बायोटॉयलेटची सुविधा, लवकरच आणखी दोन शौचालये उपलब्ध!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सागरी किनाऱ्याची नागरिकांना सैर करता यावी, यासाठी महापालिकेने कोस्टल रोडलगट सुमारे सव्वा पाच किलोमीटर लांबीचा विहार पथ तयार केला आहे. त्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी दोन बायोटॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
विहार पथावर आणखी एकून आठ ठिकाणी शौचालये उभारण्यात येणार असून, पुढील पंधरवड्यात आणखी दोन कार्यान्वित करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे या पथारी स्वच्छता अबाधित राहणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी आलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नरीमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचता यावे, यासाठी मुंबई कोस्टलरोड टप्प्याटप्याने बांधण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात मरीन ड्राइव्हपर्यंत ओळखला जाणारा कोस्टल रोडालगत असलेल्या विहारपथावर आता नागरिकांची गर्दी होत आहे. मॉर्निंग वॉक, सायकलिंग, फेरफटका मारणे, यासाठी नागरिक या पथारला पसंती देत आहेत. दरम्यान, या पथारवर स्वच्छता राहावी तसेच प्राथमिक सुविधा म्हणून स्वच्छतागृहाची व्यवस्था असावी, याकरिता पालिकेने आठ बायोटॉयलेटस् उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
वरळी डेअरीसमोर, बिंदू माधव ठाकरे चौकजवळ व्यवस्था
पालिकेने दोन बायोटॉयलेटस् पहिल्यांदा एक वरळी डेअरीसमोरील पादचारी बोगद्याजवळ आणि दुसरे बिंदू माधव ठाकरे चौकजवळच्या अंडर पासजवळ उभारले आहेत. प्रत्येक शौचालयामध्ये बायोडायजेस्टरची क्षमता ३५०० लीटर असून, अपंगांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत. महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि इन्सिनिरेटर (पॅड जाळण्याची यंत्रणा) देखील उपलब्ध आहे.
पर्यावरणास अनुकूल आणि दुर्गंधमुक्त
भरावाच्या जमिनीवर आल्याने कोस्टल रोडवर पादचारी मार्गासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या टाक्यांची सोय नसल्याने पालिकेने 'बायोडायजेस्टर' प्रणाली असलेल्या शौचालयांचे बांधकाम केले आहे.
या प्रणालीत मानवी उत्सर्जन सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने विघटित केले जाते आणि त्यामुळे कोणतेही सांडपाणी समुद्रात मिसळत नाही. त्यामुळे पर्यावरणास अनुकूल आणि दुर्गंधमुक्त व्यवस्था निर्माण होणार आहे.