Join us
Daily Top 2Weekly Top 5

Crime: यूट्युबरला ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:15 IST

Crime News: बनावट प्रोफाइल बनवून इन्स्टाग्राम आणि रेडिट साइटवर मॉर्फ केलेले आणि अश्लील फोटो अपलोड करून एका २५ वर्षीय यूट्यूबरला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.

मुंबई : बनावट प्रोफाइल बनवून इन्स्टाग्राम आणि रेडिट साइटवर मॉर्फ केलेले आणि अश्लील फोटो अपलोड करून एका २५ वर्षीय यूट्यूबरला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी वसई आणि विरार येथील दोन तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे नंदलाल बडेला (२०) आणि अंकुर देब (१९) अशी आहेत.  बडेलाने मॉर्फ केलेले फोटो यूट्यूबरच्या रेडिट साइटवर अपलोड केले आणि यूट्यूबरकडे पैशांची मागणी केली. तर आरोपी देब याने  इन्स्टाग्रामवर तिचे बनावट प्रोफाइल तयार केले. पीडित तरुणी मुंबईतील २५ वर्षांची यूट्यूबर आहे. ही घटना गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी घडली होती. वसईतील बडेला आणि विरार येथील देब या दोन आरोपींनी इन्स्टाग्रामवर तिचे बनावट प्रोफाइल तयार केले आणि रेडिटवर मॉर्फ केलेले नग्न चित्रे अपलोड करून तिला धमकावले. आरोपीने तिच्याकडे पैशांची मागणीही केली. सततच्या मागणीला कंटाळून पीडितेने सांताक्रूझ पोलिसांना याची माहिती दिली. सांताक्रुझ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे आणि परिमंडळ ९ चे  पोलिस उपायुक्त अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप विश्वासराव,  अमर पाटील, ज्योती हिबरे,  उपनिरीक्षक राहुल कोकाटे, कॉन्स्टेबल गणेश चाबुकस्वार, गणेश हंचनाळे, प्रवीण सुरवसे आणि आकाश राणे यांचे पथक तयार केले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत ते आरोपी वसई आणि विरारचे रहिवासी आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी