नऊ जणांनी निवडले दहाव्यास अध्यक्ष, फुटाणेंची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:41 AM2019-02-27T05:41:14+5:302019-02-27T05:41:18+5:30

शिवाजी नाट्यमंदिरामधील गंमत : जागतिक मराठी अकादमीची सर्वसाधारण बैठक

Twenty-nine elected president, President, Futonen's re-election | नऊ जणांनी निवडले दहाव्यास अध्यक्ष, फुटाणेंची फेरनिवड

नऊ जणांनी निवडले दहाव्यास अध्यक्ष, फुटाणेंची फेरनिवड

Next

- यदु जोशी 


मुंबई : मोठा गाजावाजा करून नव्वदच्या दशकात स्थापन झालेल्या जागतिक मराठी अकादमीच्या सर्वसाधारण बैठकीत अलिकडेच कविवर्य रामदास फुटाणे यांची नऊ जणांनी अध्यक्ष म्हणून फेरनिवड केली. ही गमतीदार बैठक शिवाजी नाट्यमंदिरच्या बोर्डरुमममध्ये झाली.


या बैठकीची जी लेखी सूचना पाठविण्यात आली होती तीत, ‘गणपूर्तीअभावी बैठक स्थगित करून ती पुन्हा घेतली जाईल’, असे नियमानुसार नमूदच केलेले नव्हते. गणपूर्ती नसतानाच बैठक घेऊन अध्यक्ष निवडले गेले. बऱ्याच वर्षांपासून वात्रटिकाकार रामदास फुटाणे हेच अकादमीचे अध्यक्ष आहेत. आता त्यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी काही निवडण्यात आली नाही. ती कधी निवडणार या बाबत बैठकीत काही स्पष्ट करण्यात आले नाही, अशी माहिती आहे.


या अकादमीला विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शासनाकडून आर्थिक मदत होत असे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीनवेळा मदतीची घोषणा केली पण एक पैसाही मिळाला नाही, असे अकादमीचे सरचिटणीस राजीव मंत्री यांनी लोकमतला सांगितले. मराठी भाषा संवर्धनासाठी अकादमी काय करते या प्रश्नात मंत्री म्हणाले की, पूर्वी आम्ही मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम घ्यायचो पण आता सगळेच तसे कार्यक्रम घेत असल्याने आम्ही बंद केले. वर्षभरात एकदा ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन आयोजित केले जाते. संमेलनांच्या स्वागताध्यक्षांच्या नावांवर नजर टाकली तर शरद पवारांपासून हितेंद्र ठाकूरांपर्यंतची नावे दिसतात. अकादमीचे कार्यालय पूर्वी मुंबईत होते. आता ते कार्यकारिणी सदस्य सचिन ईटकर यांच्या पुण्यातील घरातून चालविले जाते. आधी परिषदेची बैठक सभागृहात व्हायची. यंदा ती बोर्डरुमममध्येच आटोपण्यात आली आणि तिला अध्यक्षांसह दहा जण हजर होते.

नवीन सदस्य नोंदणी बंदच
जागतिक मराठी अकादमीची सदस्य संख्या ४५० आहे. नवीन सदस्य नोंदविणे केव्हाच बंद करण्यात आले आहे. आधी ६५० सदस्य होते. अलीकडे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला रामदास फुटाणे, यशवंतराव गडाख, जयराज साळगावकर, शशी भालेकर, शिवाजी मानकर, मोहन गोरे, सचिन ईटकर, कुमार नवाथे यांच्यासह दहा जण उपस्थित होते.

Web Title: Twenty-nine elected president, President, Futonen's re-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.