Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मुद्दामहून रात्री ट्विट करतोय"; राज्यातील प्रकल्प गुजरातला विकल्याने आव्हाडांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 08:57 IST

हा प्रकल्प गुजरात जात असल्यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

मुंबई - राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेत असल्याचा आरोपही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर केला होता. त्यानंतर, आता ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणा महत्त्वाची भूमिका असलेल्या दुध प्रकल्पाला गुजरातमध्ये हलवण्यात येत असल्याची टीका राज्य सरकावर होत आहे. महानंद डेअरीचा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भाने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री ट्विट करुन माहिती दिली. तसेच, महानंद गुजरातला विकल्याचंही त्यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात दूधाचे अनेक ब्रँड आहेत. त्यापैकी महानंद प्रकल्प गुजरातला नेण्याचा डाव असून त्यास राज्य सरकारची संमती असल्याचा आरोप विरोधकांकडून यापूर्वीही अनेकदा करण्यात आला आहे. विरोधकांच्या या आरोपामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण देताना, महानंदाचं महाराष्ट्रात अस्तित्व राहावं म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं होतं. मात्र, हा प्रकल्प गुजरात जात असल्यावरुन विरोधक पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. ''मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा... आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो, महानंद की !'', असा उपरोधात्मक टोला आव्हाड यांनी लगावला आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर असून तेथे अमूल दूधच्या गोल्डन ज्युबिली समारंभात सहभागी होत आहेत. त्यांच्या तीन दिवसीय द. गुजरातसह सौराष्ट्र दौऱ्यात ते २२,८५० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करणार आहेत. 

महानंदबद्दल काय म्हणाले होते संजय राऊत

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दूध उत्पादन दूध डेअरीचं फार मोठं जाळं आहे. त्यासाठी राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारचा एक ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटक सरकारची निवडणूक लढवली गेली. मला वाटतं महानंदा संदर्भात जे वास्तव मी पाहतो आहे, त्यावरून हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा हा प्रकार सुरू असल्याचं दिसतंय. महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे. ती ओळख पुसून टाकली जात आहे. यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार घोटाळा दिसून येत नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडगुजरातदूध