लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक असलेल्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. (एमआयएएल) सोबतचे करार रद्द केल्याच्या विरोधात विमानतळ ग्राऊंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी ‘सेलेबी’ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सेलेबीच्या उपकंपनी असलेल्या सेलेबी नॅस एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाने या तीन याचिका दाखल केल्या आहेत. सेलेबीच्या इतर दोन उपकंपन्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया आणि सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया यांनी दिल्ली विमानतळावरील करार रद्द केल्याविरोधात यापूर्वीच दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. एमआयएएलने नव्या एजन्सीसाठी सुरू केलेली निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यालय फक्त तुर्कीत!
भारत-पाक संघर्षात तुर्कीने पाकिस्तानचे समर्थन केले. पाकिस्तानला ड्रोनही पुरविले. या पार्श्वभूमीवर भारतीय विमान वाहतूक सुरक्षा नियामक संस्था बीसीएएसने गेल्या गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत तत्काळ सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली. त्यानुसार सेलेबीबरोबरील करार रद्द करण्यात आले. मात्र कंपनीने म्हटले की, कोणत्याही मानकांनुसार, कंपनी तुर्कीची नसून तिचे मुख्यालय तुर्कीमध्ये आहे.