Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न, चक्क जाळीवरच मारल्या उड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 06:39 IST

मंत्रालय परिसरात आत्महत्येचे प्रयत्न वाढू लागल्याने काही महिन्यापूर्वीच प्रशासनाने मंत्रालयात संरक्षक जाळी लावली आहे.

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी महिला असावी, यासह इतर मागण्यांसाठी आलेल्या लक्ष्मण चव्हाण या तरुणाने मंत्रालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो पुण्याचा रहिवासी आहे. या आकस्मिक घटनेमुळे सुरक्षारक्षकांची एकच धांदल उडाली.

मंत्रालय परिसरात आत्महत्येचे प्रयत्न वाढू लागल्याने काही महिन्यापूर्वीच प्रशासनाने मंत्रालयात संरक्षक जाळी लावली आहे. कोथरूड (पुणे) येथील रहिवासी असणारा लक्ष्मण चव्हाण हा तरुण सोमवारी विविध मागण्यांसाठी मंत्रालयात आला होता. मंत्री कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर त्याने अचानक मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने इमारतीखाली लावलेल्या जाळीत तो अडकल्याने बालंबाल बचावला. या प्रकारामुळे पोलिसांची मात्र भलतीच तारांबळ उडाली. त्याला पाहण्यासाठी मंत्रालयातील कर्मचारी आणि नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर अग्निशमन दल आणि पोलिसांना या व्यक्तीला जाळीतून खाली उतरवण्यात यश आले. पोलिसांना त्याला ताब्यात घेऊन मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नेले.मुख्यमंत्रीपदी महिला असावी, मंत्री व आमदारांनी आपल्या सर्व सोयीसुविधांचा त्याग करावा आणि मला नोकरी द्यावी, अशा चव्हाण याच्या मागण्या असून त्याच्याकडे ‘प्रजासत्ताक भारत’ नावाच्या पक्षाचे बॅनर होते. 

टॅग्स :मंत्रालयमुंबई