Join us

'हाच खरा शिक्षक'.... प्राचार्यांनी सरकारचा विरोध पत्करला, पण बेघर विद्यार्थ्यांना आसरा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 20:13 IST

या झोपडीतील आणि येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत शिकणारी 3 वर्षाची प्लेग्रुपची विद्यार्थीनी आपल्या आईसह प्राचार्य कौल यांना भेटल्या

मुंबई - महानगरपालिका व उपनगर जिल्हाधिकारी यांनी वर्सोवा, यारी रोड येथील कवठ्या खाडीतील 150 झोपड्या जमीनदोस्त केल्या. विशेष म्हणजे, गेल्या 20 ते 21 वर्षांपासून येथे असलेल्या सुमारे 150 झोपड्या कोणतीही नोटीस न देता आणि पर्यायी राहण्याची व्यवस्था न करता जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे हे झोपडीधारक आपल्या तान्ह्या मुलांसह सध्याच्या कडाक्याच्या थंडीत अन्न, वस्त्र निवाऱ्यासह गेली 5 ते 6 दिवस राहात आहेत. या पीडित गरजुंकडे रेशनकार्ड, आधार कार्ड आणि सर्व पुरावे आहेत. मात्र, पालिका प्रशासन, उपनगर जिल्हाधिकारी यांनी आमचा संसार उद्धवस्त करून आम्हाला रस्त्यावर आणले, अशी माहिती येथील झोपडपट्टीधारकांनी दिली.

या झोपडीतील आणि येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत शिकणारी 3 वर्षाची प्लेग्रुपची विद्यार्थीनी आपल्या आईसह प्राचार्य कौल यांना भेटल्या. आमच्या झोपड्या तोडल्याने मी गेली तीन दिवस अन्नसुद्धा घेतले नाही. सर, तुम्ही आम्हाला मदत करा. जरी आपण या बेघरांना मदत करून चूक तर करत नाही ना, असा विचार त्यांच्या मनात आला. मात्र,  विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते हे आई वडिलांप्रमाणे असते. प्राचार्य कौल यांचे मन भरून आले. त्यांनी येथील सुमारे 500 नागरिकांसह त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. तसेच त्यांना अन्न, पाणी व शौचालयाची सुविधा देऊन मोठा दिलासा दिला, अशी माहिती या झोपडपट्टीधारकांनी दिली.

ममता पुजारी, आश्विनी पुजारी या विद्यार्थीनी भवन्स कॉलेज, वेसावा विद्यामंदिर व अन्य ठिकाणी शिक्षण घेत आहेत. येथे राहणारे अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे पालक प्राचार्य अजय कौल यांच्याकडे आले. आमच्या 10 वी 12 वी च्या परीक्षा ऐन तोंडावर आल्या असतांना, निर्दयीपणे पालिका व पोलिस आमच्या वह्या, पुस्तके सुद्धा घेऊन गेले. आम्ही आता अभ्यास कसा करायचा असा सवाल त्यांनी केला.याबाबत प्राचार्य अजय कौल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला माहिती आहे की त्यांना मदत करून मोठी चूक केली. परंतु, संत गाडगे बाबांनीसुद्धा सांगितले की, जे अन्नवाचून भुके आहेत, त्यांना मदत करा. त्यामुळे माझे मन भरून आले. त्यामुळे माणूसकी जपत मी त्यांना मदत केली. विकासाच्या आड येणाऱ्या झोपड्या तोडण्याच्या विरोधात मी कदापी नाही. मात्र, त्यांना बेघर करण्यापूर्वी त्यांच्या निवाऱ्याची पर्यायी व्यवथा प्रशासनाने करायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

रविवारी सायंकाळी या झोपडपट्टीधारकांना पाठिंबा देण्यासाठी यारी रोड येथील सर्व जातीचे सुमारे 500 नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त ए.ए.खान, प्रभाग क्रमांक 59च्या शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, माजी नगरसेवक याकूब मेमन आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाने जर येत्या दोन दिवसात येथील बेघर झोपडपट्टीवासीयांना पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था केली नाही तर, आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती ए. ए. खान यांनी दिली.

टॅग्स :मुंबईविद्यार्थीनगर पालिका