Join us  

भाजपावर टीका का करते शिवसेना?; उद्धव ठाकरेंनी समजावली मैत्रीची व्याख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 6:39 AM

सत्तेतून राहून भाजपावर टीका करणाऱ्या शिवसेनेची अनेकदा खिल्ली उडवली जाते

मुंबई: सत्तेतून राहून मित्रपक्षावर टीका करणाऱ्या शिवसेनेची अनेकदा खिल्ली उडवली जाते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली मैत्रीची व्याख्या वेगळी असल्याचं म्हटलं. एखादी गोष्ट चुकत असेल, तर ती परखडपणे सांगणारा खरा मित्र असतो, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 'माझी मैत्रीची व्याख्या वेगळी आहे. एखादी गोष्ट चुकत असल्यास, ती परखडपणे सांगणारा खरा मित्र. वाहवा करणारे, भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही. देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतरही चुकत असेल तर परखडपणे सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार,' अशा शब्दांमध्ये सत्तेत राहूनही भाजपावर टीका करण्याच्या आपल्या भूमिकेचं समर्थन केलं. राजकारणात विश्वासाला खूप महत्त्व आहे, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले. मात्र विश्वासाला जागणारी पिढी आता आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदी-शहा या जोडगोळीवर शरसंधान साधलं. 'माझ्यावर माँ आणि साहेबांचे संस्कार आहेत. आजोबांच्याही अनुभवाच्या गोष्टी आहेत. पण तो जो काळ होता तो वेगळा होता. एखादा शब्द दिला की दिला. मग मागे फिरणे नाही. तोंडदेखलं तुम्हाला बरं वाटावं म्हणून एखादी गोष्ट बोलणं आणि तुमची पाठ वळल्यावर पाठीत वार करणं ही जर का नीती असेल तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा?', असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी