Join us  

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रक उलटला; वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 8:18 AM

अंधेरी आणि सांताक्रुझ पट्ट्यातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई: पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. महामार्गावरील सांताक्रुझ पुलावर आज सकाळी लोखंडी सळ्यांची वाहतूक करणारा एक ट्रक उलटला. त्यामुळे अन्य वाहनांना येण्याजाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यामुळे हा ट्रक उलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

परिणामी सध्या अंधेरी आणि सांताक्रुझ पट्ट्यातील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळच्या वेळेत अनेकजण आपापली कार्यालयचे गाठण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाल्याने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरांतून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांची आजची सकाळ तापदायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. या दुर्घटनेनंतर वाहतूक खात्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सर्वतोपरी सुरू असून लवकरच हा ट्रक रस्त्यावरून हटवण्यात येईल. यासाठी साधारण अर्ध्या तासाचा कालावधी लागेल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

 

टॅग्स :अपघातमुंबईमहामार्ग