'कोस्टल'वरील 'जय हो'चा त्रास, तक्रारींनंतर रात्री 'धून' बंद; पालिकेचा तोडगा, रहिवाशांना दिलासा
By सीमा महांगडे | Updated: March 27, 2026 06:16 IST2026-03-27T06:15:08+5:302026-03-27T06:16:13+5:30
कोस्टल रोडवरून दररोज सरासरी सुमारे ६० हजार वाहने जातात. 'जय हो' गाण्याची धून वाजविल्याने रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांना त्रास होतो.

'कोस्टल'वरील 'जय हो'चा त्रास, तक्रारींनंतर रात्री 'धून' बंद; पालिकेचा तोडगा, रहिवाशांना दिलासा
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारपट्टी मार्गावरील म्हणजे मुंबई कोस्टल रोडवरील 'जय हो' या गाण्याच्या धूनमुळे त्रास होत असल्याच्या स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी आल्यामुळे ती दररोज रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. कोस्टल रोडवरून दररोज सरासरी सुमारे ६० हजार वाहने जातात. 'जय हो' गाण्याची धून वाजविल्याने रात्रीच्या वेळी स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. ध्वनिप्रदूषण होऊन आवाजाची पातळीही वाढले. या तक्रारी करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून त्या परिसरातील काही घरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर दररोज रात्रीच्या वेळी या गाण्याची धून बंद ठेवण्याचा तोडगा काढण्यात आला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
मुंबई कोस्टल रोडवर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे (रंब्लर्स) बसविण्यात आले आहेत. या मेलोडी रोडवरून वाहन गेल्यावर 'जय हो' हे गाणे ऐकू येते. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालिकेकडून मोठा गाजावाजा करून काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.
हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, सतत वाजणाऱ्या गाण्याचा त्रास होत असल्याची तक्रार बीच कॅण्डी परिसरातील स्थानिक रहिवाशांनी केली होती.
ब्रीच कॅण्डी येथील रहिवासी संघटनेने पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून यासंदर्भात तक्रार केली होती. ही संकल्पना अमलात आणताना स्थानिक रहिवाशांना कोणतीही कल्पना दिली नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास
ब्रीच कॅण्डी परिसरात शाळा, रुग्णालय असून रात्रीच्या वेळी सततच्या गाड्या आणि सततची वाजणारी धून यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती.
त्याची दखल घेत प्रशासनाकडून आवाजाची पातळी मोजण्यासाठी संयंत्रे बसविली होती आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी ही धून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने रोडच्या बाजूला बॅरिकेडिंग ही करण्यात आले आहे.