Join us  

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये ‘वंचित’मध्ये धुसफूस, कलकोरी यांचा अपक्ष लढण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:10 AM

काही मतदारसंघांत कोणता उमेदवार द्यावा यावरून महाविकास आघाडी व महायुती त्रस्त असताना आता वंचित बहुजन आघाडीतही धुसफूस सुरू झाली आहे.

मुंबई :

काही मतदारसंघांत कोणता उमेदवार द्यावा यावरून महाविकास आघाडी व महायुती त्रस्त असताना आता वंचित बहुजन आघाडीतही धुसफूस सुरू झाली आहे. उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार संजीव कलकोरी यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांना अंधारात ठेवून माझ्या जागेवर पक्षाने अन्य  उमेदवार दिल्याचा माझा संशय आहे. प्रस्थापित पक्ष व स्थानिक नेत्यांनी माझ्याविरोधात केलेले हे कारस्थान आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याला माझी उमेदवारी पचनी पडत नव्हती. त्याने भाजपच्या वरिष्ठांना हाताशी धरून त्यांना पोषक असलेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळवून दिली, असा थेट आरोप कलकोरी यांनी पत्रकार परिषदेत केला. उमेदवार का बदलला  हे जाणून घेण्यासाठी मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहे, मात्र कोणी माझा कॉलही घेत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. या मतदारसंघात ‘वंचित’ने कलकोरी यांच्याऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी दिली असून ते बुद्धिस्ट आहेत. तसेच ते पक्षाच्या युवक आघाडीचे प्रमुख आहेत. 

खान यांना संधीउत्तर पूर्व मतदारसंघात वंचितने वंचित मुस्लिम आघाडीप्रमुख दौलत खान यांना उमेदवारी दिली असून ते शिवाजीनगर भागातील आहेत. हा भाग मुस्लिमबहुल असल्याने त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे.

... म्हणून बदललेकलकोरी हे पूर्वी भाजपमध्ये होते. भाजपशी संबंधित अन्य संघटनांशीही माझे संबंध होते असे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे भाजपशी संबंधित उमेदवार नको, असा पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. रणशूर हे आधीपासून संघटनेत आहेत, लढाऊ आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांना उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४प्रकाश आंबेडकर