Join us

८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:37 IST

पात्रताधारक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावर शासन ठाम असल्याने आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. 

मुंबई - ब्राह्यस्त्रोतांद्वारे भरती प्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी तब्बल ८ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अनंत संकटांना तोंड घ्यावे लागत आहे. आदिवासी विकास मंत्र्‍यांनी अधिवेशनात जाहीर केलेल्या भूमिकेमुळे बिऱ्हाड आंदोलक आंदोलनात बसले आहेत. सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने आता हे आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहे. राज यांच्या समोर समस्या सोडवण्याची विनंती आंदोलक करणार आहेत. 

बिऱ्हाड आंदोलकांनी बुधवारी माजी आमदार जे.पी. गावित यांची भेट घेतली. त्यानंतर आज ते मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला येणार असून समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडे म्हणणे मांडण्याची विनंती ते करणार आहेत. बाह्यस्त्रोत भरती रद्दचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेता येणे शक्य असल्याने पुढील आठवड्यात मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. आदिवासी विकास मंत्री उईके यांच्यानंतर आदिवासी आयुक्तालय प्रशासनाकडूनही पात्रताधारक शिक्षकांचीच कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर आंदोलनकर्ते शक्य त्या सर्व पर्यायांना भेटून त्यांचे गाऱ्हाणे मांडण्याच्या मानसिकतेत आहेत. 

माजी आमदार जे.पी. गावित, कामगार नेते डॉ. डी.एल कराड यांनी बुधवारी नाशिक येथे आंदोलनकर्त्यांची भेट घेत आंदोलनाची माहिती घेतली. गावित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे. आंदोलनकर्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, कामगार नेते राजू देसले शासनस्तरावर प्रयत्न करत आहेत. मात्र पात्रताधारक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावर शासन ठाम असल्याने आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. 

दरम्यान, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५० आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत. भेटीत आंदोलनकर्ते राज ठाकरे यांना आंदोलनाविषयी माहिती देणार असून समस्येवर तोडगा काढण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्याकडून देण्यात आली आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमनसे