Join us

झाड कोसळून रिक्षाचालक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 06:35 IST

मुलुंड येथे सोमवारी मध्यरात्री एका रिक्षावर झाड कोसळण्याची घटना घडली.

मुंबई : मुलुंड येथे सोमवारी मध्यरात्री एका रिक्षावर झाड कोसळण्याची घटना घडली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले अशोक शिंगरे (४५) यांचा मृत्यू झाला, तर राजेश भंडारी (२९) यांच्यावर एम.टी. अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या वर्षीच्या पावसाळ्यातील अशा प्रकारची मुंबईतील ही चौथी घटना आहे.मुलुंड (पश्चिम) येथील एन.एस. मार्गावर एचडीएफसी बँकेसमोरून रिक्षा जात असताना, तेथील मोठे झाड त्यावर कोसळले. यात रिक्षाचालक शिंगरे आणि प्रवासी राजेश भंडारी गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दोघांना तत्काळ नजीकच्या पालिकेच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे शिंगरे यांचा मृत्यू झाला.या झाडाची मुळं सडल्यामुळे कमकुवत झाली होती. त्यामुळे ते झाड कोसळल्याचे सांगण्यात येते. मात्र, या झाडाच्या धोकादायक फांद्या पावसाळ्यापूर्वीच छाटल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे. शिंगरे यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सातारा येथील त्यांच्या गावी नेण्यात आला आहे.

टॅग्स :मृत्यू