Join us

उपचार हरले आणि तणाव जिंकला! बारावीच्या विद्यार्थ्याची १५व्या मजल्यावरून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 14:10 IST

गोरेगावच्या जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर असलेल्या रहेजा हाइट्स इमारतीमध्ये १५व्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक १५०१ मध्ये राकेश कुमार (१६) हा विद्यार्थी राहत  होता.

मुंबई: गोरेगावात राहणाऱ्या १६ वर्षांच्या विद्यार्थ्यावर गेल्या काही दिवसांपासून तणावाबाबत प्रख्यात डॉक्टरकडून उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी मानसिक तणाव वाढल्याने त्याने राहत्या इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपविले. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

गोरेगावच्या जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर असलेल्या रहेजा हाइट्स इमारतीमध्ये १५व्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक १५०१ मध्ये राकेश कुमार (१६) हा विद्यार्थी राहत  होता. गुरुवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याने इमारतीच्या रिफ्यूजी परिसरातून खाली उडी घेतली. त्यावेळी घरी त्याची आई ज्योती कुमार आणि बहीण मान्या कुमार या उपस्थित होत्या. तो खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला ट्रॉमा केअर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानुसार, त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. 

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि डॉ. नितीन पंडित यांच्याकडे उपचार सुरू होते. त्याने नुकतीच बारावीची परीक्षादेखील दिली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्याला नेमके कसले टेन्शन होते याबाबत ते अधिक माहिती मिळवत आहेत. त्याच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवत घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पडताळण्यात येणार असून, त्याने सुसाइड नोट लिहिली होती का याचाही शोध सुरू आहे. मात्र या घटनेमुळे त्याच्या कुटुंबासह मित्र परिवारालादेखील धक्का बसला आहे. 

टॅग्स :विद्यार्थीमुंबई