लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : न्यू इंडिया को-ऑप. बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राणे अँड असोसिएट्सचे सीए अभिजित देशमुख यांच्या पाठोपाठ आणखी पाच ऑडिटर कंपन्यांना समन्स बजावून चौकशीला बोलावले आहे. दुसरीकडे, बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेच्या तिजोरीची रक्कम ठेवण्याची क्षमता २० कोटी असताना, १३३ कोटी रुपये ठेवल्याचे दाखविण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रोकड ठेवण्याची क्षमता सहा पटीने वाढल्यानंतरही त्याकडे बँकेच्या संचालक मंडळाने कानाडोळा का केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सीए देशमुख यांच्याकडे मंगळवारीही चौकशी करण्यात आली. २०१९ ते २०२५ या पाच वर्षांत बँकेचे वेगवेगळे ऑडिट करणाऱ्यांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे. याप्रकरणी मेसर्स युजी देवी अँड कंपनी, मेसर्स गांधी अँड असोसिएट्स, मेसर्स शिंदे नायक अँड असोसिएट्स, मेसर्स जयंत त्रिपाठी अँड असोसिएट्स आणि मेसर्स एसआय मोगुल अँड कंपनीच्या ऑडिटरला चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या ऑडिटर्संनी कोणत्या आधारावर ऑडिट केले? याबाबत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
रोकड फक्त कागदोपत्रीदुसरीकडे, बँकेच्या तिजोरीची क्षमता फक्त २० कोटी रकमेची होती. असे असतानाही प्रत्यक्षात १३३.४१ कोटी रुपयांची रोकड असल्याचे दाखविण्यात आले. त्यापैकी १२२ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला आहे. ही रोकड फक्त कागदोपत्री दाखविण्यात आली होती, असे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. तपासात तिजोरीत फक्त ११ कोटी १३ लाख रुपये आढळले होते.
संचालक काय करत होते? तिजोरीची क्षमता आणि तिजोरीत दाखवलेली रक्कम, याकडे एकाही संचालकाचे लक्ष का गेले नाही? या प्रश्नाच्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. यात आणखी किती जण सहभागी आहेत? याचा शोध सुरू आहे.