लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेने बांधलेल्या कोस्टल रोडवर लव्हग्रोव्ह उड्डाणपूलजवळील, हाजीअलीकडे जाणाऱ्या पट्ट्यात पथ दिव्यांअभावी प्रवास भीतीदायक ठरत आहे. सायंकाळी ७ नंतर या भागात काळाकुट्ट अंधार असतो. या रस्त्यावरील पथविजेच्या खांबाच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचे मार्चमध्ये उघडकीस आले होते. त्यानंतर जवळपास अडीच महिन्यानंतरही पालिकेकडून त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पावसात येथील प्रवास असुरक्षित आणि जीवघेणा ठरू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
दक्षिण मुंबईतून उपनगरात काही मिनिटांत मुंबईकरांना पोहोचवणारा कोस्टल रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला झाला आहे. मात्र, भरधाव जाणारी वाहने, डांबराचे पट्टे, धनदांडग्यांच्या वाहनांची शर्यत, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हा मार्ग कायम चर्चेत असतो. अलिकडेच या मार्गावरील लव्हग्रोव्ह उड्डाणपूल, हाजीअली उड्डाणपुलावरील पथदिव्यांच्या तांब्याच्या तारा चोरण्याच्या घटना घडल्या होत्या. खांबाच्या खालचे काँक्रीट तोडून तारा बाहेर काढल्या जातात. त्यामुळे उड्डाणपुलावरील विजेचे दिवे अनेकदा बंद पडतात. बाजारात तांब्याच्या धातूला चांगला दर मिळत असल्याने गर्दुल्ले आणि चोरांकडून ते विकले जाते. मात्र, त्यामुळे पथदिवे बंद ठेवावे लागत असून, वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. याप्रकरणी पालिका कंत्राटदाराने अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिस ठाण्यात पाच ते सहा तक्रारी केल्या आहेत.
स्पीड डिटेक्शन कॅमेरे कधी?
- कोस्टल रोडवर वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्याची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाय आतापर्यंत या मार्गावर एकूण नऊ अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.
- वांद्रे - वरळी सी-लिंक ते मरिन ड्राइव्हच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आतापर्यंत जवळपास वाहन बिघाडाच्या १५ घटना घडल्या आहेत.
- त्याचबरोबर मरिन ड्राइव्ह ते वरळीच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर घडलेल्या घटनांची संख्या ३०हून अधिक आहे. पूर्ण सुरक्षेच्या यंत्रणाअभावी अतिवेग आणि बेदरकारपणे वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.