साडेतीन तासात स्वारगेट ते मंत्रालय प्रवास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 09:21 PM2024-06-24T21:21:30+5:302024-06-24T21:22:02+5:30

अटल सेतू मार्गे शिवनेरीच्या नव्या फेरीला मोठी पसंती

travel from swargate to mantralaya is possible in three and a half hours | साडेतीन तासात स्वारगेट ते मंत्रालय प्रवास शक्य

साडेतीन तासात स्वारगेट ते मंत्रालय प्रवास शक्य

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एसटी महामंडळाने सुरू केलेल्या स्वारगेट - मंत्रालय - स्वारगेट या शिवनेरी बससेवेमुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होत आहे. स्वारगेट ते मंत्रालय हा प्रवास केवळ ३.३० तासांमध्ये करणे प्रवाशांना शक्य झाले आहे. त्यातून या बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ही फेरी हाऊस फुल धावत आहे. त्यातून एसटी महामंडळाच्या तिजोरीतही मोठी रक्कम जमा होत आहे.

मंत्रालयातील सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच दक्षिण मुंबईत विविध कामांनिमित्त येणाऱ्यांसाठी मुंबई ते पुणे असा प्रवास जलद व्हावा यासाठी एसटी महामंडळाने स्वारगेट - मंत्रालय - स्वारगेट अशी शिवनेरी बस सेवा सुरु केली आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी ही बस धावत आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणा-या अटल सेतूमुळे प्रवासाचे अंतर बऱ्यापैकी कमी झाले आहे. आता या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बस धावू लागल्या आहेत.

यापूर्वी पुणे मुंबई प्रवासासाठी बसने ४ तासांहून अधिक वेळ लागत होता. मात्र स्वारगेट ते मंत्रालय हा प्रवास अटल सेतूमार्गे केवळ ३.३० तासात होत असल्याने ही सेवा अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यातून सोमवारी आलेली स्वारगेट-मंत्रालय ही फेरी हाऊस फुल्ल होती. ही ४५ आसन क्षमता असलेली बस थेट मंत्रालयापर्यत पुर्ण क्षमतेने भरलेली होती, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यातून एसटी महामंडळा या एका फेरीतून जवळपास ४० हजारांहून अधिक उत्पन्न मिळाले, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

सोमवारी / स्वारगेट - मंत्रालय / सकाळी ६ वाजता
शुक्रवारी / मंत्रालय - स्वारगेट / सायंकाळी ६.३० वाजता

किती आहे तिकीट
फुल - ५६५
हाफ - २९५

महिलांना आणि ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिट दरात ५० टक्के सवलत आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के सवलत आहे.

असे करता येईल आगाऊ आरक्षण

आगाऊ आरक्षणासाठी ही बस सेवा एसटीच्या Mobile Bus Reservation app वर उपलब्ध करून दिली असून npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावरून देखील तिकीट आरक्षित करता येते.
 

Web Title: travel from swargate to mantralaya is possible in three and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.