मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:06 IST2025-11-15T08:04:15+5:302025-11-15T08:06:29+5:30
Mega Block Update: मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. ब्लॉक कालावधीत करी रोड, चिंचपोकळी, मशीद बंदर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.

मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
मुंबई - मुंबई लोकलच्या तीनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. ब्लॉक कालावधीत करी रोड, चिंचपोकळी, मशीद बंदर स्थानकात लोकल थांबणार नाहीत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेलदरम्यान अप - डाउन दोन्ही मार्गावर ब्लॉक असणार आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंत दुरुस्ती असणार आहे. यादरम्यान वाशी ते पनवेल दरम्यानची वाहतूक बंद राहिल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान स्पेशल लोकल धावतील . ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळदरम्यान लोकल वाहतूक सुरू राहणार आहे.
परेचा जम्बो ब्लॉक
रविवारी, बोरिवली ते राम मंदिर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर तर राम मंदिर ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. डाउन जलद मार्गावरील लोकल अंधेरी ते गोरेगावदरम्यान डाउन धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत. तर काही अंधेरी आणि बोरिवली लोकल हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंत चालविण्यात येणार आहेत.