नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?

By मनीषा म्हात्रे | Updated: May 29, 2025 05:50 IST2025-05-29T05:49:33+5:302025-05-29T05:50:08+5:30

विक्रोळीतील अनेक बांधकाम साइट्सवरून वेगवेगळी वाहने गाळाच्या नावाखाली भरण्यात आली

Transporting construction site waste in vehicles under the guise of removing silt from drains | नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?

नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?

मनीषा म्हात्रे 
 
मुंबई :
नालेसफाईच्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान विक्रोळीत एस वाॅर्डच नाही, तर एम ईस्ट आणि एम वेस्ट म्हणजेच चेंबूर ते गोवंडी, मानखुर्दपर्यंतच्या परिसरातील नाल्यासाठी वाहने बांधकाम साइटवरील ‘काला माल’ घेण्यासाठी येत असल्याचे निदर्शनास आले. “नालेसफाई झालीच नाही. आम्ही हाच माल उचलून नेतो”, असे संबंधित वाहन चालकांनी सांगितले. 

२३ ते २७ मे दरम्यान विक्रोळीतील अनेक बांधकाम साइट्सवरून वेगवेगळी वाहने गाळाच्या नावाखाली भरण्यात आली. विक्रोळीतील बांधकाम साइटवर गाळासारखा दिसणारा ‘काळा माल’ जास्त असल्याने या भागातून ‘माल’ नेण्याची ठेकेदारांची धडपड दिसून आली. एम ईस्ट वॉर्डमधील नाल्यातील ‘माल’ घेऊन आलेल्या चालकाने सांगितले, “सभी माल ऐसे ही लेके जा रहा हू, सफाई करने को टाइम नही है.” 
दुसऱ्या एका चालकाच्या म्हणण्यानुसार, विक्रोळीत ‘काळा माल’ भरल्यानंतर तो एम ईस्टमध्ये जाऊन लॉगशीट घेतो. लॉगशीट हाती येताच वजन काट्यावर नेऊन तेथून गाडी एम ईस्टमधील जागेवर उतरवतो. सगळीकडे अशाच प्रकारे चोरी सुरू आहे. ‘काळा माल’ विक्रोळीतच जास्त मिळतो. त्यामुळे येथून जास्त माल निघत असल्याने इथेच सतत फेऱ्या सुरू आहेत.  आता एकदा माल रिकामा करून पुन्हा भरण्यासाठी आल्याचेही त्याने सांगितले. तेथेही पालिकेच्या  देवनार कत्तल खान्याच्या बाजूला असलेल्या प्लॉटवर माल रिकामा करतो. मोठी सेटिंग असल्याचेही त्याने सांगितले. आतापर्यंत ‘काळा माला’च्या ६० ते ७० गाड्या मारल्या. सेठच्या म्हणण्यानुसार, लीगलच्या कामात पैसे कोण घालवणार? असेही त्याने सांगितले. 

डी.बी. एंटरप्रायझेसचा सुपरवायझर ललितच्या म्हणण्यानुसार, एम ईस्ट आणि एम वेस्ट वॉर्डही भूपेंद्र पुरोहितच पाहतो. हे वॉर्ड सगळ्यात सुरक्षित वॉर्ड आहेत.  तेथे सगळे ‘मॅनेज’ असल्याने काही त्रास होत नाही. पुरोहितने ९८ ते १०० गाड्या स्वतः खरेदी करत वेगवेगळ्या लोकांना दिल्या आहेत. त्यानुसार, ती वाहनेही या कामासाठी ऑपरेट होतात.

माेठ्या नाल्यांच्या बाबतीतही ताेच प्रकार 

पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वॉर्डचे काम देण्यात आल्याचे समजते. छोट्या नाल्यांसह मोठ्या नाल्यांतही त्याचा अशाच प्रकारे भ्रष्टाचार सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि ट्रक मालक गणेश घाडगे यांनी सांगितले. 

लॉगशीटही कुणाच्याही हाती

गाडीत माल भरून झाल्यानंतर लॉगशीट देण्यासाठी अधिकारी असणे बंधनकारक आहे. अधिकाऱ्याने मात्र एकाच वेळी लॉगशीटवर सही, शिक्का मारून त्या ठेकेदारांच्या हाती सोपवल्या. पुढे जसे टेम्पो भरतात तसे माल भरून झाल्यानंतर लॉगशीट्स चालक किंवा त्याच्या सुपरवायझरकडे सोपवताना दिसतात. अधिकाऱ्यांनी सह्या केलेले लॉगशिट बुक हाताळताना प्रवीण पुरोहित दिसत आहे.
 

Web Title: Transporting construction site waste in vehicles under the guise of removing silt from drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.