कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:42 IST2025-02-11T06:41:33+5:302025-02-11T06:42:05+5:30

सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी पुन्हा टोलनाक्याची पाहणी करून ठेकेदाराने काय काय उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला

Transport Minister Pratap Sarnaik anger rises after seeing Dahisar Toll Naka Traffic | कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार

कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार

मीरा रोड - अवजड मालवाहू वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व वाहनांचा टोल माफ होऊनही दहिसर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी कायम आहे. कोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवूनही त्याची अंमलबजावणी न केल्याचे पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा पारा चांगलाच चढला.  आपण आधी शिवसैनिक असून नंतर मंत्री आहोत, असे सांगत शनिवारपर्यंत सूचना अमलात आणल्या नाहीत तर आपण स्वतः टोलनाका फोडून टाकू, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला आहे.

हलक्या वाहनांसाठी रस्ता मोकळा ठेवण्याचे निर्देश

त्यावेळी त्यांनी तातडीने रस्त्यावरील मुंबईकडे जाताना केवळ ३ व येताना २ रांगा अवजड वाहनांच्या टोल वसुलीला आरक्षित ठेवाव्यात. उर्वरित रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा करण्यात यावा. आरक्षित रांगेची माहिती देणारे फलक दोन्ही बाजूने ५०० मीटरपर्यंत लावण्यात यावेत. यामुळे वाहनधारकांना आपली वाहने शिस्तबद्ध रीतीने संबंधित रांगेतून पुढे मार्गस्थ करणे शक्य होईल आणि वाहतूक कोंडी फुटेल, असे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले होते. सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी पुन्हा टोलनाक्याची पाहणी करून ठेकेदाराने काय काय उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला. यावेळी आरटीओचे मंगेश गुरव, मुंबई वाहतूक शाखेचे प्रमोद तावडे व मीरा-भाईंदर वाहतूक शाखेचे सागर इंगोले आदी उपस्थित होते. 

शनिवारपर्यंतची दिली शेवटची मुदत

ठेकेदाराने सांगूनही ठोस उपाययोजना न केल्याचे पाहून टोलनाका व्यवस्थापक चक्रदेव यांच्यावर मंत्री सरनाईक हे चांगलेच संतापले. तुम्हाला सांगूनही काही केले नाही. आता येत्या शनिवारपर्यंतची शेवटची मुदत तुम्हाला देत आहे. मी आधी शिवसैनिक असून नंतर परिवहन मंत्री आहे, असे सांगत शनिवारपर्यंत आदेशांचे पालन केले नाही तर मी स्वतः टोलनाका फोडून टाकणार, असा दम मंत्री सरनाईक यांनी यावेळी भरला. सरनाईकांच्या या पवित्र्याने कोंडीचा सुटणार का, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

दहिसर टोलनाक्याची सरनाईकांकडून पाहणी
दहिसर टोलनाका येथे टोल माफ झाला तरी नागरिकांचा वाहतूक कोंडीचा त्रास मात्र अजून सुटलेला नाही. टोलनाका येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी गेल्या गुरुवारी मंत्री सरनाईक यांनी महापालिका, पोलिस, आरटीओ व टोलनाका अधिकारी यांच्यासह पाहणी केली होती. 

Web Title: Transport Minister Pratap Sarnaik anger rises after seeing Dahisar Toll Naka Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.