परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 06:01 IST2025-07-03T06:00:08+5:302025-07-03T06:01:46+5:30

शासनाने नुकतेच ई-बाइक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी-शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांनाच बाइक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाइक टॅक्सी या अनधिकृत आहेत.

Transport Minister himself caught Rapido bike taxi; Transport Department falsely informed that there is no app | परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

मुंबई : राज्य शासनाने कोणत्याही बाइक ॲपला  अद्याप अधिकृत परवानगी दिलेली नसताना अवैधरीत्या ॲपद्वारे प्रवाशाची बुकिंग घेणाऱ्या रॅपिडो बाइकला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीच रंगेहात पकडले. याबाबत परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना सरनाईक यांनी विचारले असता, असे कोणतेही ॲप शहरात अस्तित्वात नसल्याची चुकीची माहिती मंत्री सरनाईक यांना देण्यात आली आहे.

शासनाने नुकतेच ई-बाइक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी-शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांनाच बाइक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाइक टॅक्सी या अनधिकृत आहेत.

‘लोकमत’ने शहरात उबर आणि रॅपिडोसारख्या संस्थांकडून अनधिकृत बाइक टॅक्सी सुरू असल्याचे वृत्त अनेकदा दिले आहे. त्यानंतर ही सेवा बंद करण्यात येईल, असे सांगत गेल्या महिन्यात परिवहन विभागाकडून या संस्थांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई?

याबाबत परिवहन विभागाला विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप आता अस्तित्वात नाही असे उत्तर परिवहनमंत्री सरनाईक यांना देण्यात आले. या माहितीची उलट तपासणी करण्याच्या हेतूने मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाइक टॅक्सी ॲपवर स्वतः अनोळखी नावाने बाइक बुक केली. तेव्हा पुढच्या दहा मिनिटांत बाइक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकात हजर झाली. अशाप्रकारे अनधिकृतरीत्या ‘बाइक ॲप’ चालवणाऱ्या संस्थेचे भांडाफोड स्वतः परिवहनमंत्र्यांनी केले. त्यामुळे आता खुद्द मंत्र्यांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अशा संस्थांसोबत परिवहन विभागाचेच साटेलोटे आहे का असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.

रॅपिडोविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिस उपआयुक्त यांच्या सोबतदेखील चर्चा करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई करणे गरजेचे आहे.

विवेक भीमनवार, राज्य परिवहन आयुक्त

Web Title: Transport Minister himself caught Rapido bike taxi; Transport Department falsely informed that there is no app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.