Join us  

पावसामुळे पुन्हा रेल्वे, रस्ते आणि मेट्रो सेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 4:36 AM

सुट्टी असल्याने बे‘हाल’ टळले; अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकात काढला दिवस

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांची दैना उडविली आहे. रस्ते, रेल्वे आणि मेट्रो मार्ग पूर्णत: ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने चाकरमान्यांना पावसाची तितकीशी झळ बसलेली नसली, तरी ही परिस्थिती कायम राहिल्यास आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरी किंवा इच्छित स्थळ गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शनिवारी सायंकळी उसंत घेतलेल्या पावसाने मध्यरात्री रौद्र रूप धारण केले. पावसाचा हा जोर रविवारी दुपारपर्यंत कायम राहिल्याने मुंबईतील बºयाच ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे ते दहिसरपर्यंत वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. बोरीवली, कांदिवली, मालाड, अंधेरी सब-वेवर पाणी तुंबल्याने वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली होती.जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मेट्रो-६ मार्गिकेचे काम सुरू असल्याने पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत होता. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली, मात्र सायंकाळी पुन्हा तेच चित्र अनेक मार्गांवर दिसत होते.पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, सायन, माटुंगा, परळ या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. घाटकोपर येथे मेट्रो मार्गाचे काम, खड्डे आणि पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. घाटकोपर-मानखुर्द, चेंबूर-सांताक्रुझ लिंक रोड, विक्रोळी-पवई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी हैराण झाले.हिंदमाता, सायन; अंधेरीत तुंबले पाणीहिंदमातासह एसआयईएस महाविद्यालय वडाळा, सायन रोड नंबर - २४ आणि गांधी मार्केट येथे पाणी तुंबले. तर पश्चिम उपनगरात कांदिवली, बोरीवली, दहिसर, अंधेरी येथे ‘तुंबई’ झाली. पूर्व उपनगरात चेंबूर, घाटकोपर, विद्याविहार, मुलुंड, कांजूर, कुर्ला आदी भागांत मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. काही बेस्ट बसच्या आत पाणी शिरल्याच्याही घटना घडल्या. काही छोटी वाहने पाण्यातून वाट काढताना मध्येच बंद पडली होती.वाहतूक वळविलीमुंबई शहरात प्रतीक्षा नगर समाज मंदिर हॉल, सायन रोड नं. २४, गांधी मार्केट (किंग्ज् सर्कल) या भागांतील वाहतूक काही काळासाठी वळविण्यात आली होती. कांजूरमार्ग येथील हुमा सिनेमा, कुर्ला कमानी आणि एलबीएस रोडवरील वाहतूक वळविण्यात आली होती. गोरेगावात मोतिलालनगर, साईनाथ सब-वे, मालाड, दहिसर सब-वे, मिलन सब-वे, सांताक्रुझ (पश्चिम), विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम) काजू पाडा, बोरीवली पश्चिम, डहाणूकर वाडी (कांदिवली पश्चिम), जुना नागरदास रोड-अंधेरी पूर्व, एस.व्ही. रोड नॅशनल कॉलेज अशा ठिकाणची वाहतूक काही कालावधीसाठी बंद करून इतर मार्गांवरून वळविण्यात आली होती.अडकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने राबविले मदतकार्यमध्य रेल्वे मार्गावर अनेक मेल, एक्स्प्रेस पावसामुळे आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने थांबल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत कार्य राबविण्यात आले.वाणिज्य आणि आरपीएफ कर्मचारी थांबलेल्या मेल, एक्स्प्रेस मध्ये जाऊन खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या आणि अन्य मदतकार्य पुरवित होते. स्थानिक नागरिक आणि इतर सामाजिक संघटनांनीही प्रवाशांना मूलभूत गोष्टी पुरविल्या. काही प्रवाशांना बसमधून इच्छित स्थळी पोहोचविण्यात आले. दरम्यान, रेल्वे रुळांची दुरुस्ती करून तत्काळ उपनगरी रेल्वे सेवा सुरळीत केली जाईल. घाट भागात अधिकारी आणि कर्मचारी मेल, एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पंपाद्वारे पाण्याचा उपसा सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनानाने दिली.२५ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळलापाऊस कोसळत असतानाच २५ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. ५८ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. २८२ ठिकाणी झाडे कोसळली. या पडझडीत सकाळी पावणेआठ वाजता गोरेगाव येथे गांधीनगरमध्ये ५ ते ६ घरांवर दरड कोसळली. दुर्घटनाग्रस्त घरे आधीच रिकामी करण्यात आली असली तरी दुर्घटनेत ४ जण जखमी झाले. जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालयात ४ जखमींवर उपचार करत त्यांना घरी पाठविण्यात आले. मोहम्मद हुसेन शेख, झुबेदा बानो शेख, अहमद हुसेन शेख, अब्दुल गफार शेख अशी या ४ जखमींची नावे आहेत. आता सुरक्षेचा उपाय म्हणून येथील ५० लोकांना स्थलांतरित करण्यात आले.रविवारी दुपारी अडीच वाजता समुद्राला भरती होती. परिणामी, गुडघाभर साठलेल्या या पावसाच्या पाण्याचा निचरा सायंकाळी उशिरा झाला. तोपर्यंत पाणी साचलेल्या ठिकाणांवरील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होती. रस्ते वाहतुकीत कुर्ला येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कमानी जंक्शन, शीतल सिनेमा, कल्पना सिनेमा, कुर्ला डेपो, कुर्ला गार्डन, सायन रेल्वे स्थानकालगतच्या परिसराचा समावेश होता. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर येथे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ४०० नागरिकांना पालिकेच्या शाळेत स्थलांतरित केले होते. या लोकांकरिता चहा, पाणी, नाश्ता आणि वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती.मुंबई-पुणे इंटरसिटी, इंद्रायणी एक्स्प्रेस आज रद्दखंडाळा घाटात कोसळलेली दरड, रेल्वे रुळांवर साचलेले पाणी आणि सिग्नल यंत्रणा वाहून गेल्याने सोमवार, ५ आॅगस्ट रोजी मुंबई-पुणे इंटरसिटी आणि इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून मध्य रेल्वे मार्ग ठप्प आहे. त्यामुळे अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस यांसह शंभराहून अधिक मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस नाशिकपर्यंत चालविण्यात येत आहेत. शेलू-नेरळदरम्यान रेल्वे रुळाखालील खडी आणि सिग्नल यंत्रणा वाहून गेल्याने येथील मार्ग बंद झाला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी युद्धपातळीवर काम आहे.सलग दुसºया दिवशीही मोनो बंदवडाळा ते चेंबूर आणि वडाळा ते जेकब सर्कल अशा दोन टप्प्यांवर धावणारी मोनोरेल सलग दुसºया दिवशी (रविवारी) बंद होती. मोनोरेलला वीज पुरवठा करणाºया मशीनमध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाल्याने ती बंद ठेवण्यात आल्याचे एमएमआरडीएतर्फे सांगण्यात आले. नवीन मशीन मागविण्यात आली असून, लवकरात लवकर मोनोरेल सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई लोकलपाऊसमेट्रोमोनो रेल्वे