मॉक पोल, मतदान यंत्राबाबत प्रशिक्षण सुरू; महापालिका निवडणुकीसाठी ५० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:39 IST2025-12-30T14:36:46+5:302025-12-30T14:39:28+5:30
यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)चे प्रात्यक्षिक दाखवित बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

मॉक पोल, मतदान यंत्राबाबत प्रशिक्षण सुरू; महापालिका निवडणुकीसाठी ५० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले धडे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा सोमवारी सुरू झाला. विविध सात ठिकाणी तीन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदान नियमावलींची माहिती देताना त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
यावेळी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम)चे प्रात्यक्षिक दाखवित बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
निवडणूक काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी केवळ मतदानाच्या दिवसापुरती मर्यादित नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर दक्षता, पारदर्शकता व काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे, अशी सूचना त्यांना देण्यात आली.
मतदानानंतर सादर करावयाची कागदपत्रे, अहवाल सादरीकरण व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय कसा ठेवावा, यावरही भर देऊन सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने व दक्षतेने काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहनही करण्यात आले. सुमारे ५० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
३५७ उमेदवारांनी अर्ज भरले
निवडणूक अधिकारी कार्यालयात सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग दिसून आली. २३ निवडणूक अधिकारी कार्यालयात ३५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.
सोमवारी १,२२५ उमेदवारी अर्जाचे वितरण करण्यात आले. पाच दिवसांत एकूण ११,५६८ उमेदवारी अर्जाचे वितरण झाले आहे. सर्वाधिक अर्ज मालाड, दिंडोशी, कुरार या विभागात वितरित झाले आहेत. त्यानंतर जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व येथूनही इच्छुकांनी अर्ज विकत घेतले आहेत.
केंद्रावर पूर्वतयारी, सुरक्षा व्यवस्था...
या प्रशिक्षणात मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची रचना, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर तसेच मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था आदींबाबत माहिती देण्यात आली.
मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मतदान केंद्राध्यक्षांची मतदान केंद्र परिसरातील जबाबदारी, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा व महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही याबाबतही त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.