विमान अपघात स्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 06:04 AM2019-09-16T06:04:46+5:302019-09-16T06:04:54+5:30

विमानतळापासून जवळ असताना विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा आणीबाणीच्या प्रसंगी ते जवळच्या मैदानात उतरविण्यात येते.

Training on how to handle plane crash situations | विमान अपघात स्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण

विमान अपघात स्थिती हाताळण्याबाबत प्रशिक्षण

Next

मुंबई : विमानतळापासून जवळ असताना विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा आणीबाणीच्या प्रसंगी ते जवळच्या मैदानात उतरविण्यात येते. मात्र, विमान उतरविताना आग लागून मोठी दुर्घटना घडण्याचा संभव असतो. अशा वेळी मदतकार्य कशा प्रकारे राबवावे, याबाबत विविध आपत्कालीन यंत्रणांना रविवारी मुंबई विमानतळावर प्रशिक्षण देण्यात आले.
मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या मार्गावर रविवारी मॉक एक्सरसाइज एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट आॅफ द एअरपोर्ट या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विमानतळ प्रशासन, मुंबई पोलीस, अग्निशमन दल, रुग्णालय प्रशासन, सीआयएसएफ, रुग्णवाहिका सेवा, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा विविध यंत्रणांनी सहभाग घेतला व आणीबाणीच्या प्रसंगी मदतकार्यास सज्ज असल्याचा संदेश दिला.
प्रत्यक्षात अशी दुर्घटना घडली, तर नेमके काय करायचे व कशा प्रकारे अशा प्रसंगांना सामोरे जायचे, याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. या मॉकड्रिलमध्ये अधिक जिवंतपणा आणण्यासाठी एक नकली विमान तयार करण्यात आले होते व त्यामध्ये अंशत: आग लागल्याची स्थिती तयार करण्यात आली होती. यामध्ये स्थानिक पोलिसांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात आले. मृत प्रवाशांना जवळच्या कूपर रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठविणे व त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. जखमी प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना रुग्णालयात पाठविण्यात आले आणि त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली.
एसएनडीटी विद्यापीठाच्या मैदानावर ‘गो एअर’च्या सहकार्याने मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता या मॉकड्रिलचा प्रारंभ झाला व दुपारी १ वाजता याचा समारोप झाला.

Web Title: Training on how to handle plane crash situations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.