वाहतूक पोलिस उतरवतात मद्यपी चालकांची ‘झिंग’

By मनीषा म्हात्रे | Updated: August 25, 2025 11:28 IST2025-08-25T11:27:51+5:302025-08-25T11:28:13+5:30

Traffic police News:

Traffic police crack down on drunk drivers | वाहतूक पोलिस उतरवतात मद्यपी चालकांची ‘झिंग’

वाहतूक पोलिस उतरवतात मद्यपी चालकांची ‘झिंग’

- मनीषा म्हात्रे
(उपमुख्य उपसंपादक)

मुंबईत वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबवली जात असल्याने चालकांचे धाबे दणाणले आहे. या विशेष मोहिमेंतर्गत केवळ दंडच आकारला जात नाही तर थेट गुन्हे नोंदवून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जात आहे. शिवाय, परवाने रद्द करून संबंधितांची नावे आणि माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहे. या आक्रमक कारवाईमुळे रस्त्यावरील सुरक्षेला चालना मिळाली आहे. मद्यधुंद ड्रायव्हिंगच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत १,११७ जणांचे परवाने रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातील ८८४ परवाने  आरटीओने सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये याच कालावधीत ४,७५८ प्रकरणांची नोंद झाली होती, तर यंदा ही संख्या घटून १,८२६ वर आली आहे. ही घट कारवाईच्या तीव्रतेचा आणि जनजागृतीचा परिणाम असल्याचे अधिकारी सांगतात.

सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा वेग वाढला आहे. या वाहन चालकांची नावे एक्सवर प्रसिद्ध केली जात आहेत. या सामाजिक प्रसिद्धीमुळे नागरिकांमध्ये भीती आणि जाणीव निर्माण होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दुसरीकडे, आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित केले जातात. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित चालकास योग्य सुनावणीचा अधिकार दिला जातो. याशिवाय, १०० मि.ली. रक्तात ३० मि.ग्रॅ. पेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्यास ती व्यक्ती नशेत मानली जाते, असे स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांविरुद्धही कडक कारवाई करत परवाने रद्द करण्याबाबत आरटीओकडे शिफारस करण्यात आली.

यापूर्वी तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी देखील मद्यपी, विरुद्ध दिशेने वाहन चालविणारे, विना हेल्मेट आणि विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांविरोधात  गुन्हे नोंदवत परवाने रद्द करण्याच्या कारवाई केल्या होत्या. दुसरीकडे ई-चलन कारवाईनंतर दंड वसुलीसाठी सहा महिन्यांनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे पाठपुरावा होतो. मात्र, बरेच जण त्याकडेही दुर्लक्ष करताना दिसतात. तसेच थकीत ई-चलन असलेला वाहनचालक पुन्हा वाहतूक पोलिसांच्या समोर येईलच असे नाही, मात्र आरटीओकडे त्याचे  येणे नेहमीचे असते. अशा चालकांकडून दंड वसुलीसाठी आरटीओची मदत घेण्यात येणार आहे. जेणेकरून थकीत ई-चलन चालकाचे आरटीओशी निगडित कामासाठी जाताच तेथे दंड वसूल केल्याशिवाय कामे होणार नाही. त्यामुळे ई-चलन वसुलीचा आकडाही वाढत आहे. येत्या काळात ही कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Traffic police crack down on drunk drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.