घाटकोपर- भांडुपची 'कोंडी' सुटेना, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 15:52 IST2026-02-01T15:50:55+5:302026-02-01T15:52:53+5:30
मानखुर्द येथील सिग्नलचा अडसर दूर झाल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर सुसाट येणारी वाहने, नव्याने खुला झालेला विक्रोळी उड्डाणपूल आणि त्या जोडीला ईस्टर्न फ्रीवे ते ठाणे साकेत येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे विक्रोळी ते भांडुपदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे.

घाटकोपर- भांडुपची 'कोंडी' सुटेना, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मानखुर्द येथील सिग्नलचा अडसर दूर झाल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर सुसाट येणारी वाहने, नव्याने खुला झालेला विक्रोळी उड्डाणपूल आणि त्या जोडीला ईस्टर्न फ्रीवे ते ठाणे साकेत येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे विक्रोळी ते भांडुपदरम्यान वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस प्रशासनावर मोठा ताण येत आहे. मात्र, नवा उड्डाणपूल पूर्ण होईपर्यंत या वाहतूक कॉडीचा सामना करावा लागेल असे दिसते.
ही समस्या सोडविण्यासाठी जेथे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले तेथील बॅरिकेइस वाहतूक पोलिसांनी हटवले आहेत. काही ठिकाणी वाहतूक सेवा रस्त्यांवर वळविली आहे. जेव्हीएलआर उड्डाणपूल जेथे संपतो, तेथील बॅरिकेड्सही आत घेण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
वाहतूक नियमनासाठी मनुष्यबळात वाढ
महामार्गावर दोन फूट अतिरिक्त जागा मिळाली आहे. जेव्हीएलआर पुलाच्या ठिकाणी गरज भासल्यास उलट दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी एक मार्गिका ठेवली जात आहे. वाहतूक कोंडी २ टाळण्यासाठी प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात असून मनुष्यबळातही वाढ केली आहे, असे वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
'या' मार्गावरून रोज लाखो वाहनांची ये-जा
रोज लाखो वाहनांना विक्रोळी गोदरेज येथे सिग्नल लागतो, पण हा सिग्नल अल्पकाळच असतो, त्यानंतर वाहने थेट ठाण्याच्या दिशेने येऊ लागतात. या व्यतिरिक्त विक्रोळी पूर्व आणि पश्चिम जोडणारा नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे त्याही ठिकाणची वाहने महामार्गावर आल्यानंतर वाहतूक कोंडी होते.
... तरच होईल सुटका
महामार्गावरील वाहतूक कोंडी कित्येक पटीने वाढली आहे. विक्रोळीचा नवीन उड्डाणपूल आणि साकेतदरम्यान प्रस्तावित असलेला नियोजित पूल यामुळे वाहतूक कोंडी होत असून ठाण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम बऱ्यापैकी मार्गी लागल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल, तोपर्यंत वाहनचालकांना आणखी काही काळ कळ सोसावी लागणार आहे.
वाहनचालक हैराण
मुंबई शहर व उपनगरांना ठाण्याशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून रोज लाखो वाहनांची वाहतूक या मार्गावरून होते. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे वाहनचालक हैराण होत आहेत.